नाशिक: कडाक्याच्या थंडीने नाशिककर अक्षरशः गारठले आहेत. सायंकाळनंतर शीतलहरींमुळे अंगाला बोचणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येतो आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण सुरू आहे. शनिवारी (ता. २०) किमान तापमानाने नीचांकाचा नवा स्तर गाठला. निफाडचे तापमान ४.५ अंशांवर, नाशिकचे ६.९, मालेगावचे ७.८, तर जळगाव जिल्ह्याचे किमान तापमान ६ अंश नोंदविले.
उत्तर महाराष्ट्रात रविवारी (ता. २१) देखील थंडीची लाट कायम राहाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. थंडीचा कडाका वर्षअखेरपर्यंत सहन करावा लागू शकतो. यंदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव जिल्हावासियांना येतो आहे. सातत्याने तापमान घसरत असून, किमान तापमानाचा नीचांकी स्तर गाठला जातो आहे.
शुक्रवारी (ता. १९) निफाडचे किमान तापमान ५.४ अंश, नाशिकचे ७.४ अंश सेल्सिअस नोंदविले होते. निफाडच्या तापमानात जवळपास आणखी एक अंशाने घसरण झाली असून, शनिवारी ४.५ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. नाशिकचे किमान तापमान घसरून ६.८ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
उत्तर महाराष्ट्रात अशीच परिस्थिती कायम असून, सातत्याने पाऱ्यामध्ये घसरण नोंदविली जाते आहे. दिवसा प्रखर सूर्यकिरणांमुळे थंडीचा कडाका जाणवत नसला तरी, सायंकाळ होताच वातावरणातील शीतलहरींमुळे तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे दिवसा २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान कमाल नोंदविले जात असताना, रात्री उशिरा तापमान घसरून ५ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान पोहचते आहे.
द्राक्षाला वाढता धोका
आधीच अवकाळी, अतिवृष्टीने झोडपलेल्या बळीराजापुढे घसरत्या तापमानाने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाग, शेतात धूर करण्यासह इतर विविध प्रयत्न करताना पीक वाचविण्यासाठी दमछाक करावी लागते आहे.
Screen Time & Epilepsy in Children: 'स्क्रीन टाईम' अधिक असलेल्या मुलांना एपिलेप्सीची जोखीम; नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या तज्ज्ञांचे निरीक्षणसाथीच्या रोगांचा प्रादुर्भाव
एकीकडे सायंकाळनंतर कडाक्याची थंडी असताना, दुसरीकडे दिवसा दुपारचे काही तास कडक ऊन पडत आहे. त्यामुळे किमान तापमानाने नीचांकी स्तर गाठूनही कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहात आहे. तापमानातील या तफावतीमुळे साथीचे रोग बळावण्याचा धोका वर्तविला जातो आहे. विशेषतः सर्दी, खोकला, ताप व इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो आहे.