अंडर-19 एशिया कप 2025 चा (Under 19 Asia Cup) अंतिम सामना काल पार पडला. त्यामध्ये पाकिस्ताने भारतावर सहज विजय मिळवत दुसऱ्यांचा या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. मात्र पाकिस्तानच्या विजयापेक्षा सध्या भारतीय संघच पुन्हा चर्चेत आहे, त्याचं कारणही खास आहे. एशिया कपच्या फायनलनंतर मैदानात जे झालं तो सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. अंडर-19 एशिया कप 2025 फायनलमध्ये उपविजेते ठरलेल्या टीम इंडियाने (Team India) मेडल सेरेमनी दरम्यान मोहसीन नक्वी यांच्या हातून ती मेडल्स स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सीनिअर एशिया कपची फायनल जिंकल्यानंतर जो वाद झाला होता, त्याच्याच आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तेव्हाही टीम इंडियाने आशिया कप जिंकल्यानंतर एसीसी अध्यक्ष, मोहसीन नक्वींकडून (Moshin Naqvi) ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती कालही (रविवार, 21 डिसेंबर) झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे भारत-पाकमधील तणाव पुन्हा दिसून आला.
मेडल सेरेमनीपासून पुन्हा दूर
सहसा, अंतिम सामन्यानंतर, दोन्ही संघ पोडियमवर जातात, परंतु यावेळी भारतीय संघाने वेगळा मार्ग निवडला. भारतीय खेळाडू स्टेजवर पोहोचले नाहीत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) असोसिएट मेंबर डायरेक्टर मुबाश्शिर उस्मानी यांच्याकडून त्यांचे उपविजेते पदाची मेडल्स स्वीकारली. तर दुसरीकडे, एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी विजेत्या पाकिस्तान संघाला ट्रॉफी दिली आणि त्यांच्यासोबत स्टेजवर आनंद साजरा करताना दिसले.
मात्र असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी भारतीय संघाने मोहसीन नक्वींकडून सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. काही महिन्यांपूर्वीच, भारतीय संघाने सीनिअर पुरुष आशिया कपच्या अंतिम सामन्यात नक्वींकडून विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या सामन्यात पाकिस्तानला हरवून भारताने आशियाकपचे विजेतेपद मिळवले होते, तर पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं होतं.
जुना वाद पुन्हा उफाळला
सिनियर आशिया कपच्या फायनलनंतर, ट्रॉफी सोहळा सुमारे एक तास उशिराने सुरू झाला. भारतीय संघाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास संमती दिली नाही. एवढंच नव्हे तर, नक्वी हे त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले आणि त्यांनी ती ट्रॉफी एसीसी मुख्यालयात परत आणली. या निर्णयामुळे बीसीसीआय संतापली आणि हे प्रकरण एसीसी आणि आयसीसीपर्यंत पोहोचले, परंतु इतके महिने होऊनही ट्रॉफी अद्याप भारताला सुपूर्द करण्यात आलेली नाही.
नक्वी यांच्या भारतविरोधी सोशल मीडिया कारवाया आणि भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असे निर्णय घेत असल्याचे मानले जाते.
फायनलमध्ये पाकिस्तानचा विजय
अंडर-19 एशिया कपच्या फायनलबद्दल बोलायचं झालं तर वनडे फॉरमॅटमधील या मॅचमझ्ये पाकिस्तानने भारताला 191 धावांनी हरवत दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने 172 धावांची शानदार खेळी केली आणि संघाने 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चांगली सुरुवात असूनही, भारतीय संघ टिकून राहू शकला नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा झाल्या, परंतु सतत विकेट पडल्याने संघ फक्त 26.2 षटकांत 156 धावांवर ऑलआऊट झाला.