मनात भक्ती, सतत देवाचे नामस्मरण पण नियती आडवी आली, त्या चौघांसोबत काय घडले?
Tv9 Marathi December 22, 2025 03:45 PM

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण सध्या वाढले आहे. गेल्या २४ तासांत बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यात दोन अत्यंत भीषण अपघात झाले आहेत. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे मलकापूर आणि शिक्रापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

बुलढाण्यात झाडाला धडकून कारचा चक्काचूर 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर-धुपेश्वर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मलकापूर येथील पाच मित्र कारने धुपेश्वरच्या दिशेने जात असताना धरणगाव जवळ हा अपघात झाला. रात्रीची वेळ असल्याने रस्ता रिकामा होता. त्यामुळे कारचा वेग जास्त होता. मात्र धरणगावजवळ अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचापुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला.

या अपघातात रुद्र पवार (१९), विनायक अत्तरकार (२०) आणि गणेश इंगळे (२०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यात देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील चाकण-शिक्रापूर महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. कारमधील तरुण देवदर्शन घेऊन आनंदाने आपल्या घराकडे चाकणच्या दिशेने निघाले होते, मात्र वाटेतच काळाने घाला घातला. शिक्रापूर परिसरातील सणसवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका अवजड ट्रकने कारला जोरदार धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार, ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात ही समोरासमोर धडक झाली असावी. धडक लागताच कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि कार ट्रकच्या खाली अडकली.

कार चालक सागर थोरात याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेले इतर तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, रात्रीच्या वेळी वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे आणि ओव्हरटेकिंग करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.