Pune Crime : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराईतावर गुन्हा दाखल!
esakal December 22, 2025 10:45 PM

पुणे : पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्ता भागातील आव्हाळवाडी परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात सराईत गुन्हेगार जखमी झाला होता.

ओंकार दिलीप भंडारी (वय २६, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार भंडारी याच्याविरुद्ध वाहनांची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी (ता. २०) सायंकाळी तो आव्हाळवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वाघोली पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले.

Pune Police Firing : सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांवर गोळीबार; प्रत्युत्तरात आरोपी जखमी; नगर रोडवर थरार!

पोलिसांनी सापळा रचला असता, भंडारी झुडपात लपलेला आढळून आला. त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेली गोळी भंडारीच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.