पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) लोहगाव येथे वाहनतळ, रुग्णालय, उद्यान अशी महत्वाची आरक्षणे रद्द करून तेथे दिल्लीच्या धर्तीवर ‘भारत मंडपम’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर हरकत घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण या प्रकल्पाबाबत कोणतीही सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे हरकत-सूचना नोंदविण्याची मुदत एक महिना वाढवावी आणि सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
माझा प्रभाग, माझी जबाबदारी ः राजेंद्र जगतापलोहगाव येथील सुमारे ३० एकर जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देताना रस्ते, उद्याने, रुग्णालय व वाहनतळांची आरक्षणे उठविली जाणार आहेत. यामुळे परिसरातील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित राहतील तसेच भविष्यात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेने आरक्षण बदलासाठी जाहीर प्रकटन काढले असले तरी प्रकल्पाचा तपशील, निधी, प्रस्तावक व शासन आदेश याबाबत माहिती दिलेली नाही. माहिती शिवाय हरकती मागविणे अन्यायकारक असल्याचे सांगत, सर्व कागदपत्रे सार्वजनिक करूनच प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.