Mhaswad Municipal Result: 'म्हसवडला जयकुमार गोरेंची एकहाती सत्ता'; नगराध्यक्षपदासह २० जागा भाजपला, दाेन्ही भावांची दिलजमाई, काय घडलं..
esakal December 23, 2025 05:45 AM

-सलाउद्दीन चोपदार

म्हसवड : म्हसवड पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्याच फेरीपासून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेत पालिकेवर आपला झेंडा रोवला. विरोधातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येऊन सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या सर्व जागेतील उमेदवारांसह शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !

पालिका निवडणुकीत २० जागांसाठी ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पूजा सचिन वीरकर, सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, तर बहुजन समाज पक्षाकडून रूपाली वाल्मीक सरतापे यांनी निवडणूक लढविली. इतर दहा प्रभागांतून निवडणूक रिंगणातील सर्व पक्षांच्या उमेदवारांसह काही उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते.

पहिल्या प्रभागातील फेरीपासून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती. सर्व दहा प्रभागांतील उमेदवारांच्या मतमोजणीत कायम ठेवीत विजय मिळवत असल्याचे निदर्शनास येताच मतमोजणी केंद्रासमोरील प्रांगणात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत गुलालाची उधळण सुरू केली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा वीरकर यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच १०७७ मताधिक्याची घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवून ११ हजार ६४० मते मिळवली. त्यांनी ४८४४ मताधिक्यांनी विजय मिळविला. सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने यांना ६,७९६ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार रूपाली सरतापे यांना ११३ मते मिळाली. नगरसेवकपदाच्या भाजपच्या सर्व उमेदवारांनी प्रभाग एकपासून घेतलेली आघाडी कोणत्याच प्रभागात कमी झाली नसल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा वीरकर व भाजपच्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत पालिकेची सत्ता हाती घेतली आहे.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विश्वासू सहकाऱ्यांसह प्रचाराचे नेटके नियोजन करीत मंत्री गोरे यांनी विरोधकांना सर्वच ठिकाणी धोबीपछाड देत पालिकेवर एकहाती भाजपचा झेंडा रोवला आहे. दरम्यान, या निवडणुकीत पती- पत्नी दांपत्याने निवडणूक जिंकली. माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी व त्यांची पत्नी माजी उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी विजय मिळविला.

पालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे यांची दिलजमाई झाली. त्यानंतर शेखर गोरे यांनी भरलेले सर्व उमेदवारांचे अर्ज काढून घेऊन मंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला होता. निवडणुकीत भाजप विरोधातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, रासप यांनी एकत्रित येऊन सिद्धनाथ नागरिक आघाडी स्थापन करून भाजपपुढे आव्हान उभे केले होते. या आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी मंत्री महादेव जानकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप आदींच्या प्रचार सभा झाल्या होत्या. मात्र, मंत्री गोरे यांनी आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवून दिली.

मातब्बरांना दणका

भाजपच्या चैताली शिंदे यांनी प्रभाग एक (अ) मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांची मुलगी भाग्यश्री यांच्याविरोधात विजय मिळवला.

माजी उपनगराध्यक्ष महादेव मासाळ हे प्रभाग दोन (अ) मध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना भाजपच्या सतीश मासाळ यांनी पराभूत केले.

प्रभाग पाच (ब) मध्ये तीन उमेदवार उभे होते. त्यामध्ये भाजपच्या प्रज्योत कलढोणे यांना उच्चांकी १५०५ मते मिळाली.

माजी उपनगराध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी विरुद्ध राजघराण्यातील शिवमाला राजेमाने यांच्यात प्रभाग सहा (ब) मध्ये लढत झाली. यामध्ये सूर्यवंशी यांनी बाजी मारली.

प्रभाग सात (ब) मध्ये माजी नगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी स्नेहल सूर्यवंशी सहा (ब) मधून निवडून आल्या.

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्चित..

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून येथील राजेंच्या विरोधात निवडणूक लढविण्याची संधी दिली. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. याबद्दल मी मतदारांसह कार्यकर्त्यांचे आभार मानते. म्हसवडच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करेन.

- पूजा वीरकर, नगराध्यक्षा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.