कऱ्हाड : भरधाव डंपरच्या धडकेत निवृत्त शिक्षक ठार, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. सैदापूर परिसरातील लक्ष्मी गार्डन हॉटेलसमोर सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. बाबासाहेब शामराव तपासे (वय ६३, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे, तर त्यांच्या पत्नी श्रीमंतिनी तपासे जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बाबासाहेब तपासे आज सकाळी पत्नी श्रीमंतिनी यांच्यासह दुचाकीवरून ओगलेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. पाठीमागून आलेल्या डंपरने जोराची धडक दिली. त्यात बाबासाहेब तपासे व त्यांच्या पत्नी श्रीमंतिनी गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारापूर्वी बाबासाहेब यांचा मृत्यू झाला, तर पत्नी श्रीमंतिनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. डंपर चालक शशिकांत शिवाजी फल्ले (रा. वाघेरी, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.