पुणे - 'लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते', अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नाराजी नाट्याला धुडकावून लावले, तर 'महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल.' असे सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्ष कार्यालयास भेट देत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेत महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला.
'अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही, मात्र स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. पूर्ण शंका निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सर्व जबाबदारी माझी आहे' असल्याचे सुळे यांनी सांगितले.
सुळे म्हणाल्या, "पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहीजे. त्याबाबत पक्षांमध्ये चर्चा झाली पाहीजे. त्यादृष्टीने आमची महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष पुण्याच्या विकासासाठी एकत्रित येऊन निवडणूक लढण्याविषयी चर्चा करत आहेत.
पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादी, दोन्ही ठाकरे, कॉंग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे'.
प्रशांत जगताप यांच्या नाराजी व राजीनामानाट्याविषयी सुळे म्हणाल्या, "लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते. जगताप यांना मुंबईत मागील दोन दिवस चार ते सहा तास देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न रास्त आहेत. र्चेतून मार्ग निघत असतो. पुण्याच्या हितासाठी चर्चा होत असेल तर, त्यामध्ये गैर काय ? सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारत घेऊनच पक्ष निर्णय घेईल.'
सुळे म्हणाल्या,
- जी रामजी विधेयकातून महात्मा गांधी यांचे नाव वगळले
- भाजपने मनरेगा योजनेतूनही गांधींचे नाव काढले
- गरिबांना मनरेगातून मिळणारा १०० टक्के निधी आता मिळणार नाही
- विशाल तांबे यांनी निवडणूक लढावी, अशी माझी इच्छा होती.
- घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याबाबतची चर्चा माझ्या कानावर आलेली नाही.
- पुण्यात पाणी, कचरा, वाहतूक कोंडी, वायु-जल प्रदूषणासारखे प्रश्न गंभीर आहेत.