Mhada Home Draw : म्हाडाच्या सव्वाचार हजार घरांची सोडत आचारसंहितेमुळे लांबणीवर
esakal December 25, 2025 03:45 AM

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वाचार हजार घरांची सोडत आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. आचारसंहिता सुरू असल्याने ही सोडत काढता येत नसल्याचे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही सोडत आता फेब्रुवारीतच होण्याची शक्यता आहे.

पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत चार हजार १६८ घरांची सोडत म्हाडाकडून काढण्यात आली आहे. या सोडतीसाठी दोन लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्याने ही सोडत काढण्यास विलंब झाला. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत ११ डिसेंबरला काढण्यात येणार होती.

मात्र, विक्रमी संख्येने अर्ज आल्यामुळे अर्जांच्या पडताळणीला वेळ लागला. त्यानंतर म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही सोडत १६ किंवा १७ डिसेंबरला काढण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. त्यामुळे ही सोडत काढता आली नाही, अशी माहिती साकोरे यांनी दिली.

दरम्यान, पुण्यासह अन्य ११ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत. त्यासाठीही याच दरम्यान आचारसंहिता लागल्यास ही सोडत आता थेट फेब्रुवारीतच निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली असली तरी त्याची परवानगी घेऊन सोडत जाहीर करू, असे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले होते. मात्र, ही परवानगी न मिळाल्यानेच सोडत लांबणीवर पडली आहे.

म्हाडाकडे ४४६ कोटी जमा

प्रत्येक अर्जासोबत ७०८ रुपये शुल्क आणि २० हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार दोन लाख १५ हजार ८४७ अर्जदारांनी ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये म्हाडाकडे जमा केले आहेत. सोडत लांबणीवर पडल्याने या काळात जमा झालेल्या पैशावरील व्याज राज्य सरकारला मिळणार आहे. हे व्याज आम्हाला मिळावे, अशी मागणी अर्जदारांकडून होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.