बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हिजाब वाद अजूनही चर्चेत आहे. 15 डिसेंबर रोजी आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब हटवला होता. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात त्यावरून मोठा वाद झाला होता. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला आहे. जावेद अख्तर, झायरा वसीम यांसारख्या कलाकारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यादरम्यान आता भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे हिनेही आपलं मत व्यक्त केलं आहे. हिजाब वादावरून नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यापासून आम्रपाली दुबेसुद्धा स्वतःला रोखू शकली नाही.
याविषयी आम्रपाली म्हणाली, “माझ्या मते कपडे हा प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक पसंतीचा भाग आहे. पण जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत इतरांच्या भावनांचा सन्मान करणं गरजेचं आहे.” आम्रपाली दुबेच्या आधी ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा या घटनेवर तीव्र शब्दात टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी संबंधित महिलेची विनाशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिलं, ‘जे कोणी मला थोडंफार ओळखतात, त्यांना ही गोष्ट माहित आहे की मी पर्दाच्या किती विरोधात आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे काही केलं, त्याचं मी समर्थन करेन. मी तीव्र शब्दात याची निंदा करतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या महिलेची विनाशर्त माफी मागायला पाहिजे.’
नेमकं प्रकरण काय?ही घटना 1000 हून अधिक आयुष डॉक्टरांच्या नियुक्ती पत्र वितरण समारंभात घडली होती. डॉ. नुसरत परवीन ही मुस्लीम तरुणी स्टेजवर हिजाब घालून आली होती. तेव्हा तिला नियुक्ती पत्र देताना मुख्यमंत्री नितीश कुमार तिच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढताना दिसतात. यामुळे ती तरुणी गोंधळते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दंगल चित्रपटात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित नितीश कुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली.