सातपूर: अन्नप्रक्रिया क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, यासाठी उपलब्ध विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. रणजित सिंह यांनी केले.
केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या विकासाच्या उद्देशाने किरणोत्सर्गाद्वारे निर्जंतुकीकरण व अन्न चाचणी प्रक्रियांच्या पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण या विषयावर नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने निमा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रणजित सिंह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे संचालक अमित जोशी, अणुऊर्जा विभागाचे संचालक नितीन जावळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे उपसचिव विवेक सिंह, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. गौतम, एनएबीएलच्या संयुक्त संचालक रिनी नारायणन, स्टार्टअप इंडियाचे मार्गदर्शक श्रीकांत पाटील, केसीसीआयचे संचालक नकुल लाखे, तसेच आयआयटी मुंबईचे अतिथी प्राध्यापक डॉ. सुनील घोष उपस्थित होते.
कार्यशाळेत अन्न सुरक्षितता व गुणवत्तावृद्धी, नियामक मानके, शासकीय योजना व प्रोत्साहने, तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रातील बाजार विकासाच्या संधी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि गुणवत्तातज्ज्ञ एकाच मंचावर एकत्र आले होते. अन्न किरणीकरण व अत्याधुनिक अन्न चाचणी सुविधांमुळे कापणीपश्चात होणारे नुकसान कमी करणे, नियमांचे पालन सुनिश्चित करणे, तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करणे, या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
डॉ. रणजित सिंह यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. उपसचिव विवेक सिंह यांनी नियामक चौकट, मानके आणि उपलब्ध प्रोत्साहन योजनांबाबत मार्गदर्शन केले. अणुऊर्जा विभागाचे संचालक (प्रशासन) आयएएस नितीन जावळे आणि डॉ. एस. गौतम यांनी अन्न किरणीकरणाची वैज्ञानिक प्रक्रिया व सुरक्षिततेचे पैलू स्पष्ट केले.
डॉ. अमित जोशी यांनी धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. रिनी नारायणन यांनी अन्न चाचणी प्रयोगशाळांतील मान्यताप्राप्ती आणि गुणवत्ता हमीचे महत्त्व विशद केले, तर डॉ. सुनील घोष यांनी अन्न सुरक्षितता प्रणालीतील नवकल्पना व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी स्थानिक उद्योजकांच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे असलेल्या मागण्यांचा आढावा घेत नाशिकमध्ये अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी निमाचे प्रयत्न सुरू असून, केंद्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले. गेल्या वर्षभरात नाशिकमध्ये ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात निमाच्या पदाधिकाऱ्यांना यश आल्याची माहितीही त्यांनी दिली.
PCMC Election : पुढील आठ दिवस लगबगीचे; महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज वितरण; स्वीकृती सुरूऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. स्टार्टअप समितीचे श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. चर्चासत्रास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनीष सानप, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, अन्नप्रक्रिया समितीचे प्रमुख वैभव नागसेठिया यांच्यासह उद्योजक आणि विविध शासकीय संस्थांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.