Christmas 2025: हिरव्या सँटाला लाल करण्यामागे कोका-कोलाचा हात...पण कसा? जाणून घ्या मनोरंजक गोष्ट
esakal December 25, 2025 07:45 PM

अलीकडे ऑस्ट्रेलियात सँटा क्लॉजच्या शरीरयष्टीवरून वाद रंगला आहे. शॉपिंग मॉलमध्ये जाडजूड सँटा दाखवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी एका आरोग्य क्षेत्रातील संशोधकाने केल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मते, उशी किंवा इतर साधनांच्या मदतीने सँटा जाड दाखवणं चुकीचा संदेश देतं आणि अति खाण्याच्या सवयींना चालना देऊ शकतं. यावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, काहींनी याला थेट ‘बॉडी शेमिंग’ही म्हणलं आहे. मात्र या वादातून एक रंजक प्रश्न मात्र समोर आला आहे. सँटा क्लॉज खरंच नेहमीपासूनच असा जाडजूड दाखवला जात होता का?

खरं तर आज आपण पाहतो तो हसरा आणि गोलमटोल सँटा फार जुना नाही. सँटा क्लॉजची सुरुवात तिसऱ्या शतकातील सेंट निकोलस नावाच्या संतांपासून झाली. ते सध्याच्या तुर्कीतील मायरा शहरात बिशप होते. अतिशय साधे स्वभावाचे आणि मदतीसाठी ओळखले जाणारे ते गरजू मुलांना मदत करताना ते कुणालाही कळू नये म्हणून त्यांच्या घरांच्या चिमण्यांमधून नाणी किंवा भेटवस्तू टाकत असत. त्या काळातील चित्रांमध्ये सेंट निकोलस हे सडपातळ शरीराचे दाखवले गेले आहेत. मग आजाचा सँटा गोलमटोल कसा?

१९व्या शतकात सँटा क्लॉजच्या रूपात हळूहळू बदल होऊ लागला. १८०९ साली लेखक वॉशिंग्टन इर्व्हिंग यांनी आपल्या पुस्तकात सेंट निकोलसना हसरा, जाडजूड आणि एल्फसारखा दाखवलं. त्यानंतर १८९० च्या सुमारास व्यंगचित्रकार थॉमस नॅस्ट यांनी मोठं पोट आणि आनंदी चेहरा असलेला सँटा लोकांमध्ये लोकप्रिय केला.

१९३० च्या दशकात कोका-कोलाच्या ख्रिसमस जाहिरातींमुळे लाल आणि पांढऱ्या रंगातील सँटा जगभर प्रसिद्ध झाला. या जाहिरातींनी सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून ही प्रतिमा लोकांच्या मनात ठामपणे बसवली. त्यामुळे हळूहळू तोच सँटा सर्वांना परिचित वाटू लागला.

कोका-कोलाच्या जाहिराती येण्याआधी सँटा क्लॉज विविध देशांमध्ये, कथा-परंपरांमध्ये आणि कलाकारांच्या कल्पनेनुसार वेगवेगळ्या रूपात दिसत होता. काही ठिकाणी तो हिरव्या किंवा तपकिरी कपड्यांत दिसायचा, तर काही ठिकाणी निळ्या रंगाच्या पोशाखातही दाखवला जायचा. त्याच्या रूप, देहयष्टी आणि कपड्यांच्या रंगाबाबत कोणताही ठराविक मापदंड नव्हता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.