सेवा रस्त्यांवर मनस्ताप
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गैरसोय
कासा, ता. २४ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी ते अल्फा हॉटेलपर्यंत दुतर्फा सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे, पण महालक्ष्मी मंदिरापर्यंतचा एक ते दीड किलोमीटरचा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.
चारोटी येथे सहा ते सात वर्षांपूर्वी उड्डाणपूल बांधताना चारोटी ते महालक्ष्मीपर्यंत सेवा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काम अर्धवट राहिल्याने स्थानिक नागरिकांना महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सेवा रस्ता अपूर्ण असल्याने अनेक वाहने चुकीच्या दिशेने जात असून, त्यामुळे गंभीर अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. मुंबई वाहिनीकडून बसवतपाडा येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना महामार्ग ओलांडावा लागतो. याच ठिकाणी एसियन पंपावर पेट्रोल, डिझेल व सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने चॅरिटी उड्डाणपुलाखालून जातात. या धोकादायक परिस्थितीमुळे शेकडो अपघात झाले आहेत. शेतकरी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे.
-------------------------
अल्फा हॉटेलपर्यंत झालेला सेवा रस्ता पुढे महालक्ष्मी-विवळवेढेपर्यंत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी महिनाभर मोठी यात्रा भरते. भाविकांची मोठी गर्दी असते. सेवा रस्ता झाल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे
----------------------
चारोटी ते बसवतपाडा परिसरातील विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांना महामार्ग ओलांडावा लागतो. आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे एसियन पंपसमोर उड्डाणपूल, पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीने अनेक वेळा ठराव केले आहेत.
- प्रणय मेहर, उपसरपंच, चारोटी ग्रामपंचायत.
-------------------------------
महामार्ग प्रशासनामार्फत सुरक्षा सल्लागारांकडून पाहणी सुरू आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ८५ किमी सेवा रस्त्यांपैकी ८३ किमी सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. अतिक्रमण, पार्किंगवर कारवाई तसेच अपघातस्थळी रेलिंग लावण्याचे काम सुरू आहे.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.