गोल्ड सिल्व्हर आउटलुक 2026 नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 मध्ये जोरदार वाढ झाली आहे. या वर्षात सुरु झालेली तेजी वर्षाच्या अखेरपर्यंत तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या दरातील तेजीमुळं गुंतवणूकदारांना परतावा मिळाला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2024 मध्ये चांदीचे दर 85146 रुपये किलो होते. आता चांदीचे दर सव्वा दोन लाख रुपयांवर पोहोचले आहेत.
एका वर्षात चांदीच्या दरात 144 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर देखील 73 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळं सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत. 2026 मध्ये देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी कायम राहणार का प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे.
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक नवीन माथूर यांच्या मते 2026 मध्ये देखील सोने आणि चांदी दरातील तेजी कायम राहील. मात्र, वेग कमी असू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला. नवीन यांच्या मते कमी व्याज दर आणि जागतिक स्थिती पाहता सोन्याचे दर स्थिर राहू शकतात. औद्योगिक मागणी वाढल्यानं चांदी सोन्याच्या तुलनेत अधिक परतावा देऊ शकते.
आयबीजेएचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोनं 1.50 लाख ते 1.65 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. चांदीच्या दरात देखील तेजी पाहायला मिळू शकते. चांदीचे दर 2.30 लाख ते 2.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्यानं सोनं खरेदी केलं जात असल्यानं जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे औद्योगिक वापरासाठी कारखान्यांकडून चांदीची मागणी वाढल्यानं ते देखील दर वाढत आहेत.
तज्ज्ञांच्या मते सोन्यात दीर्घ काळासाठी एसआयपी करणं चांगला पर्याय असू शकतो. सेनको गोल्डच्या सुवंकर सेन यांनी सोन्यामुळं स्थिरता मिळेल तर चांदीतील दरवाढीमुळं अधिक नफा कमावण्याची संधी आहे. सिद्धार्थ जैन यांनी चांदीमध्ये देखील एसआयपी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते दरात वेगानं तेजी किंवा घसरण येऊ शकते, त्यामुळं एसआयपी चांगला पर्याय आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा