Kolhapur Election : पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू, पण शब्द दुसऱ्यालाच; महायुतीत इच्छुकांची उघड नाराजी
esakal December 26, 2025 01:45 PM

कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवार ठरविण्यासाठी पदाधिकारीच नेते झाल्यामुळे इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्याकर्त्यांशी चर्चा सुरू ठेवली आहे,

दुसरीकडे नेत्यांनी निर्णय दिला, म्हणून भागात प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे जागा वाटप नावालाच राहिले आहे. परिणामी, अखेरच्या टप्प्यात ऐनवेळी धक्कातंत्र पाहण्यास मिळणार असल्याचे चित्र आहे.

Kolhapur Politics : चंदगडमध्ये मानापमानाच्या नाट्याने ठाकरे गट एकाकी; आघाडी न मिळाल्याच्या आक्रमकतेमुळे, शिंदे गटाची राजकीय समीकरणे बदलली

महायुतीत शिवसेना शिंदे गटात दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते इच्छुकांबाबत निर्णय घेतात. आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव वरिष्ठ पातळीवर चर्चा करीत आहेत.

स्वतःच्या पक्षात चर्चा करताना हे सर्व एकत्रित आहेत. उर्वरित महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीशी (अजित पवार गट) चर्चा करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार क्षीरसागर दिसत आहेत.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

भाजपात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जंयत पाटील आदी पदाधिकारी सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटात अशीच स्थिती आहे.  सर्वस्तरांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असली तरीही याबाबत इच्छुकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

धक्कातंत्र शक्य...

ऐनवेळी कोणी दगाफटका केला तर काही इच्छुकांना हातच्याला ठेवले आहे. ही नेत्यांची चाल इच्छुकांनीही ओळखली आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. कोणता पक्ष हे नंतर अधिकृत जाहीर करणार आहेत.

एका पक्षाने उमेदवारी दिली नाही तर ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढविण्याची तयारीही इच्छुकांनी ठेवली आहे. ऐनवेळी धक्कातंत्र देण्याची ही भूमिका इच्छुकांनी घेतली आहे.
विशेष करून प्रमुख पक्षांबाबत हे दिसणार आहे.

जाहीर यादी नावालाच...

महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर नाही. इच्छुकांना नेकमे कोणाकडे जायचे? हेच कळत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या नेत्यांचे नाव सांगून इच्छुकांचा ताकतुंबा करीत आहेत.

अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसऱीकडे नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे थेट पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून प्रचार सुरू झाला आहे. काही ठिकाणी नेते प्रभागातील प्रचारात येत आहेत. त्यामुळे जाहीर होणारी यादी नावालाच राहणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.