Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
esakal December 27, 2025 08:45 AM

डोंबिवली : बाहेर कोण काय बोलतं, युती होणार की नाही या चर्चांकडे लक्ष देण्याची गरज नाही. महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असून चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुढाकार घेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत नियमित बैठका सुरू आहेत. महायुतीमध्येच निवडणूक लढवून जिंकण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

डोंबिवलीत आयोजित ‘विजय निर्धार’ सभेत ते बोलत होते. यावेळी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, भाऊसाहेब चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मनसे नेते राजू पाटील यांनी महायुतीच्या चर्चांवर केलेल्या विधानावर उल्लेख करताना, त्यांचे नाव न घेता शिंदे यांनी बाहेर कोण काय बोलतय यावर लक्ष देऊ नका असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “महायुतीच्या चर्चेत कोणाला काय कमी जास्त मिळाले, यापेक्षा आपला अजेंडा विकासाचा आहे, विकास आमचा विषय आहे.” त्यामुळे महायुतीतच आपण लढणार असे सांगत त्यांनी आजच्या निर्धार मेळाव्यात विरोधकांना चारी मुंड्या चित करून विकास करण्याचा निर्धार करा असे आवाहन केले.

“ब्रँड ब्रँड म्हणणाऱ्यांचा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत बँड वाजवायचा आहे,” असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे–राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयावरही टीका केली. “महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे एकत्र आले आहेत. मुंबईकडे ते ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ म्हणून पाहत आहेत. सत्तेसाठी, खुर्चीसाठी ते एकत्र आले; मात्र आमचा लढा मुंबईच्या आन-बान-शानसाठी आहे,” असे ते म्हणाले.

लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांत भगवा फडकला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकांतही महायुतीचाच भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्ही बोलतो कमी आणि कामे जास्त करतो, ही बाळासाहेबांची शिकवण आम्ही अंगीकारली आहे,” असे सांगत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. डोंबिवलीकरांनी त्यांना निवडून देताना सिंहाचा वाटा उचलला असून त्यांनी मतदारसंघात विकासाचा रतीब घातल्याचेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्यासारखे’, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

“मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झालो तरी आजही एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. तुम्हीही ‘एकनाथ शिंदे’ म्हणून काम करा, घराघरात शिवसेना पोहोचवा,” असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले; त्यांच्यासाठी मोफत दवाखानाही सुरू केला, तरी ती दुखणी कमी होत नाहीत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना ‘जमालगोटा’ तुम्हालाच द्यायचा आहे.”

महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्यासोबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे बाहेरच्या चर्चांकडे लक्ष न देता कामाला लागा, असा विश्वास आणि संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.