-rat२६p८.jpg-
P25O13561
मिलिंद साठे
---------
व्यक्तीविशेष .................लोगो
चिपळूणचा तेजस्वी मानबिंदू - मिलिंद साठे
कोकणातून साधारण परिस्थितीतून येऊनही आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या ताकदीवर अफाट यश संपादन केलेल्या माणसांच्या यादीमध्ये मिलिंद साठे या आमच्या वर्गमित्राचे नाव हे खूप उच्चस्थानी असणार आहे, याची मला खात्री तर आहे. त्यांचा मला प्रचंड अभिमान आहे. अशा असाधारण व्यक्तिमत्त्वाबरोबर जीवनातील काही काळ घालवण्याची संधी मिळाली ते आमचे भाग्य होते. मिलिंद यांच्या देदिप्यमान यशाबद्दल चिपळूणकरांकडून आज त्यांचा होत असलेला सत्कार पुढच्या पिढीला प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही.
- हेमंत भागवत, चिपळूण.
---
माणसाच्या आयुष्यात असे काही प्रवास असतात की, त्या काळातील काही सहप्रवासी कायमची छाप सोडून जातात. माझा व मिलिंद साठे यांचा दोन-चार वर्षांचा महाविद्यालयामधील सहप्रवास त्या प्रकारात मोडतो. महाराष्ट्राचे नवनियुक्त ॲड. जनरल मिलिंद साठे व मी डीबीजे महाविद्यालयाचे १९७८च्या बीएससीच्या बॅचचे वर्गमित्र. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तो काळ राजकीयदृष्ट्या तरुणपिढीसाठी खूप उत्तेजना देणारा होता. मला वाटते, रामपूर हायस्कूलमधून अकरावी करून मिलिंद डीबीजे महाविद्यालयामध्ये १९७४ ला आले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रथमपासूनच शांत स्वभावाचे; पण ओळख झाल्यावर खूप खोली असलेले आहे, याची जाणीव लगेचच व्हायची. ते त्या वेळी मितभाषी वाटले तरी जे बोलेल ते दीर्घकाळ लक्षात राहील, असे असायचे. विचार करून नेमके बोलायची ही सवय पुढे वकिलीपेशामध्ये त्यांना नक्कीच उपयोगी पडली असेल. कुशाग्र बुद्धिमत्ता, तरतरीत व्यक्तिमत्त्व व आनंदी चेहरा या गोष्टी महाविद्यालयापासूनच त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. मालघरहून अपडाउन करत असूनही त्यांची एनर्जीची पातळी कायम वरची असायची. गप्पांची मैफल असो, महाविद्यालय निवडणुकीची धामधूम असो किंवा स्नेहसंमेलनाची गडबड असो मिलिंद हे आमच्या ग्रुपचे खूप सक्रिय सदस्य असायचे. एक गंमतशीर आठवण म्हणजे आम्ही आणीबाणीच्या काळात काँग्रेस नेतृत्वावर जेव्हा तोंडसुख घ्यायचो त्या वेळी मिलिंद, त्याच्या साठे आडनावावरच्या निष्ठेमुळे वसंतराव साठ्यांच्या बचावासाठी कायम सज्ज असायचे. पुढे महाविद्यालयीन शिक्षणानंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या.
एअरफोर्समध्ये नोकरी करत असताना सुटीवर आल्यावर मिलिंद यांची कायदा क्षेत्रातील प्रगती मित्रांकडून समजत असे. ते अनेक वेळेला दिल्लीला कामानिमित्त येत-जात असे. एकदा असेच कधीतरी टेलिफोन संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. पुढे नोव्हेंबर २००३ मध्ये प्रत्यक्ष भेटीचा योग अचानक जुळून आला. शिवाजी पार्कवर नो युवर आर्मी असे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात स्कायडायव्हिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेल्या टीमचे मी नेतृत्व करत होतो. कलिनामधील आर्मी बेसवरून मी ऑपरेट करत होतो. मिलिंद त्या वेळी मुद्दामहून वेळ काढून भेटले. खूप गप्पा झाल्या. कॉलेजच्या जुन्या आठवणी जागवल्या गेल्या. आर्मी मेसमध्ये न जेवता मिलिंद हे मला एका महागड्या हॉटेलमधे जेवायला घेऊन गेले. बोलताना त्यांच्या व्यवसायातील गमतीजमती ऐकताना त्यांच्या प्रगतीचा अंदाज येत गेला व अभिमानाची जाणीव मनात घर करून गेली. यांची व्यवसायातील गती यापुढे आणखीन स्पीड पकडणार आहे हे त्याचवेळी लक्षात आले. पुढे जेव्हा ते मुंबई बार असोसिएशनचा अध्यक्ष झाले तेव्हा मला तसे आश्चर्य वाटले नाही. योग्य माणूस योग्य ठिकाणी पोचल्याची भावना मात्र मनात नक्कीच निर्माण झाली. त्यांचा कायदा क्षेत्रातील विशाल अनुभव, कुशाग्र बुद्धिमत्ता, अचूक विवेचन करण्याची क्षमता, विचारांची नैतिकता व खोली यां गुणांमुळे ते या नियुक्तीला न्याय तर देइलच; पण निःस्पृहतेचे, नैतिकचे व व्यावसायिक गुणवत्तेचे नवे आयाम कायम करतील, याची मला खात्री आहे.
मिलिंद यांची तत्त्वज्ञानातील आवड व गती या दोन्ही गोष्टी मला आश्चर्याचा सुखद धक्का देणाऱ्या होत्या. ही त्यांची बाजू मला अजिबात ज्ञात नव्हती. वयाच्या साठीनंतर जेव्हा माणूस अगदी साध्या साध्या गोष्टी विसरायला लागतो त्या वेळी गीतेचे अठरा अध्याय मुखोद्गत असणे ही गोष्टच विस्मित करणारी आहे. एका असामान्य मेंदूच्या अस्तित्वाची ती ग्वाही आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अॅडव्होकेट जनरल या अत्युच्च पदावर झालेली मिलिंद यांची नियुक्ती ही सर्व चिपळूणसाठी गर्वाची घटना आहे. आजकालच्या काळात नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अजूनही समाजामध्ये गुणवत्तेला किंमत आहे, हे प्रस्थापित करते. आज एका अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी एक विचित्र अशी लढाई लढली जात आहे. त्याचे पडसाद सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक व राजकीय क्षेत्रात निरनिराळ्या पातळीवर आपल्याला दिसून येतात. या पार्श्वभूमीवर मिलिंद यांची नवी नेमणूक अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणांना दिशा देणारी असणार आहे.
(लेखक भारताचे निवृत्त एअर चीफ मार्शल आणि अॅड. जनरल मिलिंद साठे यांचे वर्गमित्र आहेत.)