चाकूर - नायगाव (ता. चाकूर) येथे दारू व सिगारटे दे म्हणून काठीने डोक्यात मारहाण करून बार मालकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) रात्री साडे अकरा वाजता घडली आहे. गजानन नामदेव कासले (वय-४२) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी तिघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, संशयीत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथक नियुक्त करण्यात आले आहे.
नायगाव - मुळकी उमरगा रस्त्यावर गजानन कासले यांचे बार अॅड रेस्टॉरंट आहे. शुक्रवारी रात्री तिघेजण हॉटेलमध्ये आले त्यांनी दारू व सिगरेट दे म्हणून शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरूवात केली, बार मालकास काठीने डोक्यात, शरिरावर जबर मारहाण केली, वेटर अजय मोरे हा सोडविण्यासाठी गेला असता त्यासही मारहाण केल्यामुळ तो गंभीर जखमी झाला.
बारमधील टीव्ही फोडला तसेच हाॅटेलातील दहा ते पंधरा हजार रूपये रोख रक्कम विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन तिघेंजण फरार झाले. यात बार मालक गजानन कासले यांच्या डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून संशयीत व्यक्तींची ओळख पटण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह चाकूर पोलिसांचे पथक संशयीत आरोपीला शोध घेत आहेत. याबाबत मयताचा भाऊ बालाजी नामदेव कासले यांच्या फिर्यादीवरून तिघांजणाविरूध्द खून तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बालाजी भंडे पुढील तपास करीत आहेत.