>> अक्षय शेलार
एका खासगी गुप्तहेराच्या तपासाची ही कहाणी अमेरिकन भांडवलशाही, भ्रष्ट सत्ताकेंद्रे आणि वैयक्तिक नैतिकतेच्या विफलतेबद्दल, नैतिक नि सामाजिक पडझडीबद्दल बोलते.
रोमन पोलान्स्की दिग्दर्शित `चायनाटाऊन’ हा न्यू हॉलीवूड काळातील सर्वाधिक गुंतागुंतीचा आणि प्रभावी सिनेमा मानला जातो. निओ-न्वार पद्धतीच्या या क्लासिकने अमेरिकन सिनेमात सत्य, खोटे, नैतिकता आणि असहाय्यता एकत्र गुंफून एक गडद चित्र उभे केले. 1930 च्या लॉस एंजेलिसमध्ये घडणारी ही कहाणी वरकरणी एका खासगी गुप्तहेराच्या तपासाची आहे, पण प्रत्यक्षात ती अमेरिकन भांडवलशाही, भ्रष्ट सत्ताकेंद्रे आणि वैयक्तिक नैतिकतेच्या विफलतेबद्दल, नैतिक नि सामाजिक पडझडीबद्दल बोलते.
जॅक निकोल्सनने साकारलेला जेजे ऊर्फ जेक गिटीज हा गुप्तहेर पारंपरिक न्वार नायकांच्या परंपरेला साजेसा आहे. चतुर, संशय घेणारा, परंतु व्यापक चित्रात असहाय्य असणारा. तो एका कौटुंबिक प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करतो आणि हळूहळू लॉस एंजेलिसच्या पाणीपुरवठा व जमिनींच्या राजकारणात अडकतो. `चायनाटाऊन’चा महत्त्वाचा पैलू म्हणजे सत्तेची पातळी सतत बदलत जाते. मग ते गुन्हेगार असोत, व्यापारी असोत, की राजकारणी आणि कायद्याचे रक्षक, इथे सगळेच भ्रष्ट ठरतात.
या सिनेमातलं दृश्यवैशिष्टय़ लक्षवेधी आहे. सिनेमॅटोग्राफर जॉन ए. अलॉन्झो यांनी क्लासिक न्वार शैलीला 70 च्या दशकाच्या वास्तववादी रंगछटांशी मिसळलं. सावल्या, सोनेरी सूर्यप्रकाश, धुळीने माखलेली शहरं आणि भवताल या सगळ्यातून भ्रष्टाचाराचं जाळं अधिक ठळक होतं. `चायनाटाऊन’ची खरी ताकद मात्र त्याच्या पटकथेत आहे. रॉबर्ट टाऊनने लिहिलेली ही पटकथा हॉलीवूडच्या इतिहासातील श्रेष्ठ पटकथांपैकी एक मानली जाते. कारण ती फक्त गुह्याची उकल करत नाही, तर समाजातील सत्तेचा दुरुपयोग आणि वैयक्तिक जीवनातील पडझड, शोषण उघड करत जाते. नोआ ाढा@स (जॉन ह्युस्टन) हे पात्र या भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत रूप आहे. सत्ता आणि दुष्टता यात काहीच सीमारेषा नाहीत, हा यातून आलेला स्पष्ट संदेश.
पोलान्स्कीचा क्लायमॅक्स तर न्यू हॉलीवूड काळातील सर्वाधिक धक्कादायक शेवट आहे. गिटीजच्या अथक प्रयत्नांनंतरही निष्पाप पात्राचा मृत्यू होतो आणि खरा गुन्हेगार सुटतो. “फर्गेट इट, जेक. इट्स चायनाटाऊन.” – ही वाक्यं अमेरिकन सिनेमाच्या स्मरणात कोरली गेली आहेत. इथे `चायनाटाऊन’ म्हणजे फक्त लॉस एंजेलिसमधलं एक भौगोलिक ठिकाण नाही, तर ते म्हणजे भ्रष्टाचार, दडपशाही आणि असहाय्यतेचं रूपक बनतं आणि एकूणच अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतं.
सांस्कृतिक पातळीवर `चायनाटाऊन’ने अमेरिकन प्रेक्षकांच्या `व्यवस्थे’बद्दलच्या शंका अधिक तीव्र केल्या. व्हिएतनाम युद्ध, वॉटरगेट स्कँडल आणि सतत वाढणारा राजकीय अविश्वास या सगळ्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आला. परिणामी, भ्रष्टाचार केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही, तर वैयक्तिक जीवनाच्या नात्यांमध्येही शिरतो, हे वास्तव `चायनाटाऊन’ने थेट दाखवून दिलं. त्यामुळे न्यू हॉलीवूडमधील इतर चित्रपटांप्रमाणे हा सिनेमादेखील केवळ रंजनतेपुरता मर्यादित न राहता अमेरिकन मानसिकतेचा आरसा ठरला. न्यू हॉलीवूडने घडवलेल्या या महत्त्वाच्या चित्रपटात पोलास्कीने साकारलेली निराशेची, निरुत्तरतेची छाया पुढच्या दशकांतील थरारपट आणि निओ-न्वार र्निर्मितींमध्ये ठळकरीत्या जाणवते.
`चायनाटाऊन’चा प्रभाव अनेक पातळ्यांवर जाणवतो. न्वार शैली नव्या पिढीसाठी पुनर्जीवित करणं, 70 च्या दशकातील अमेरिकन समाजाच्या शंका-कुशंका प्रतिबिंबित करणं आणि सिनेमाच्या माध्यमातून सत्तेच्या भयावहतेवर टिप्पणी करणं या सगळ्या बाबी यात चपखलपणे एकवटल्या आहेत. न्यू हॉलीवूड चळवळीतील इतर सिनेमांप्रमाणेच इथेही नायकाचा विजय होत नाही. नायक शेवटी हतबल ठरतो, सत्याचा शोध घेण्याचा त्याचा प्रयत्न असफल ठरतो. उलट प्रेक्षकाला सत्याची अस्वस्थ जाणीव होते. या साऱयामुळे `चायनाटाऊन’ केवळ एक गुन्हेगारी थरारपट किंवा न्वार हेरपट न राहता अमेरिकन सिनेमातील सत्तेच्या संरचनेवरचा दस्तऐवज ठरतो. त्यामुळेच तर भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धच्या असहाय्यतेचं त्यातील चित्रण आजही अस्वस्थ करतं.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)