AAP Party : महाविकास आघाडीतून 'आप' बाहेर; पुण्यात १०० हून अधिक जागांवर उमेदवार देणार
esakal December 28, 2025 03:45 PM

पुणे - पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांत आम आदमी पक्ष (आप) महाविकास आघाडीसमवेत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. पक्ष पुण्यात १०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची पुणे महापालिकेच्या जागावाटपाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यात ‘आप’साठी काही जागा सोडण्याचे सूतोवाच महाविकास आघाडीने केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

घराणेशाही, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदींबाबत त्यांच्या नेत्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणुका न लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाला विलंब झाला आहे. तसेच ‘आप’ने पुण्यात ४१ उमेदवारांची घोषणाही केली आहे. मुंबईत १५, पिंपरी चिंचवडमध्ये १५, कोल्हापूरमध्ये १५ उमेदवारांची घोषणा केली आहे.

नाशिकमध्येही पक्षाचे उमेदवार अल्पावधीत जाहीर होतील. पुण्यात १०० पेक्षा जास्त जागा लढविण्याची पक्षाने तयारी केली आहे, असेही किर्दत यांनी नमूद केले. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची मुंबई, पुण्यात जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाचे नेते संजय सिंह, राघव चढ्ढा आदी नेतेही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.