जे कर्नाटक पोलिसांना जमलं नाही ते महाराष्ट्र पोलिसांनी केलं… बंगळुरूत जाऊन थेट… मोठ्या कारवाईने खळबळ
Tv9 Marathi December 28, 2025 03:45 PM

महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) आंतरराज्य ड्रग्ज तस्करीच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. नवी मुंबईतील एका छोट्या दुव्यावरून सुरू झालेला तपास थेट कर्नाटकच्या राजधानीपर्यंत पोहोचला. जिथे भरवस्तीत चालणारे एमडी (Mephedrone) ड्रग्ज बनवणारे तीन कारखाने पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर ते पूर्णपणे नष्ट केले.

या कारवाईची ठिणगी नवी मुंबईतील वाशी येथे पडली होती. वाशी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे असे आढळून आले की, या ड्रग्जचा पुरवठा हा कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरातून होत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने एक विशेष पथक तयार करून बंगळुरूला रवाना केले.

तपास कसा झाला?

बंगळुरूमध्ये पोहोचलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांवर पाळत ठेवली. यावेळी पोलिसांनी मूळ राजस्थानचे रहिवासी असलेल्या पण गेल्या काही काळापासून बंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या सूरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोन मुख्य तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यांची कडक चौकशी केली असता, त्यांनी शहरातील गजबजलेल्या वस्तीत सुरू असलेल्या कारखान्यांची माहिती दिली.

यातील स्पंदना लेआउट कॉलनी येथे आर जे इव्हेंट नावाच्या फॅक्टरीच्या आडोशाने ड्रग्जची निर्मिती केली जात होती. तर एनजी गोलाहळी भाग असलेल्या या ठिकाणी रसायनांच्या साहाय्याने एमडी तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासोबत येरपनाहळी कन्नूर येथील एका निवासी आरसीसी बंगल्यात चोरट्या मार्गाने प्रयोगशाळा उभारण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा या तिन्ही ठिकाणांवर छापे टाकले, तेव्हा तेथील दृश्य पाहून अधिकारीही थक्क झाले. या ठिकाणी रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर घातक रसायने आणि यंत्रसामग्री वापरून एमडी तयार केले जात होते.

एमडी ड्रग्ज जप्त

या कारवाईत २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये ४ किलो १०० ग्रॅम तयार स्वरूपातील, तर १७ किलो द्रव स्वरूपातील ड्रग्जचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे सेंट्रीफ्युज मशीन, हिटर्स, विविध रसायने आणि पॅकिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आता तपासात असे समोर आले आहे की, या कारखान्यांमध्ये तयार होणारे ड्रग्ज केवळ महाराष्ट्र किंवा कर्नाटकच नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात होते. या काळ्या धंद्यातून आरोपींनी बंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता (Real Estate) खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील ४ आरोपी सध्या कोठडीत आहे. मुख्य सूत्रधारांसह इतर २ आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना झाली आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस महासंचालक (CID) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि पोलीस उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.