BMC Election : ठाकरे बंधूंच्या प्रस्तावाने पवारांची धाकधूक वाढली, मुंबईत फक्त इतक्याच जागा देणार, नवा फॉर्म्युला समोर
Tv9 Marathi December 28, 2025 07:45 PM

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या मतदानासाठी राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा झाली असून, सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला केवळ १६ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

निवडणुकीतील कामगिरीचा आधार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने किमान २५ जागा मिळाव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीमागे राष्ट्रवादीने मागील निवडणुकीतील कामगिरीचा आधार घेतला आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. या हक्काच्या जागांसह पक्षविस्तारासाठी अतिरिक्त जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा पारंपरिक जनाधार आहे आणि जिथे स्थानिक उमेदवार प्रबळ आहेत, अशा ठिकाणच्या जागा सोडण्याची विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

ठाकरे बंधूंकडून १६ जागांचा प्रस्ताव

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला त्यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी जागांचा आकडा १६ वर मर्यादित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, नुकताच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे बोललं जात आहे. आता मित्रपक्षांना जागावाटप करताना ठाकरेंची कसोटी लागत आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंनी हा १६ जागांचा प्रस्ताव दिल्याचे समजते.

राष्ट्रवादीला आपल्या वाट्याला अधिक जागा मिळाव्यात असे वाटत असले, तरी ठाकरेंच्या प्रस्तावामुळे जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी ही बैठक सकारात्मक असल्याचे म्हटले असले, तरी अंतिम आकड्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, महाविकास आघाडीत नेमका कोणता विनींग फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील एकजुटीवर परिणाम होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस १६ जागांच्या प्रस्तावावर समाधानी नसल्याने येत्या काळात यावर आणखी काही फेऱ्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रवादीला अपेक्षित २५ जागा मिळाल्या नाहीत, तर महाविकास आघाडीच्या मुंबईतील एकजुटीवर याचा काय परिणाम होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.