पनवेल, ता. २८ (बातमीदार) : महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन चळवळीतील विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनांना सोबत घेऊन पनवेल महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने समन्वयातून ही आघाडी उभी करण्यात आली आहे. मविआमध्ये ‘मोठा भाऊ’ म्हणून भूमिका निभावताना शेतकरी कामगार पक्षाला काही प्रमाणात त्याग करावा लागल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. काही सध्याच्या जागा आम्हाला सोडाव्या लागल्या आहेत, मात्र सर्व सहकारी पक्षांना सोबत घेऊन चालण्यासाठी हा त्याग आवश्यक होता, असेही ते म्हणाले.
जागावाटपाचा अंतिम आराखडा ठरल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत पनवेलच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
शहराच्या विकासाला गती देणार!
पनवेल महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, जनभावनांच्या विरोधात सुरू असलेले कामकाज आणि सत्तेची मनमानी पद्धत यांना पर्याय देण्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र येत आहे. पनवेल शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांवर आधारित कारभार आणण्यासाठी ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पनवेल महापालिकेतील भ्रष्टाचार आणि जनविरोधी कारभाराला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत आहे. सर्व सहकारी पक्षांना सोबत घेऊन चालण्यासाठी आम्ही त्याग केला आहे. ही निवडणूक सत्तेसाठी नाही, तर पनवेलकरांच्या हक्कासाठी लढवली जाणार आहे.
- बाळाराम पाटील, माजी आमदार