13969
खारेपाटण विद्यालय देशात अव्वल
‘कला उत्सव’मधील यश; लोकसंगीत समूह वाद्यवादनात सर्वोत्कृष्ट सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २८ ः पुणे येथील राष्ट्रीय कला उत्सवमध्ये जिल्ह्यातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या प्रशालेच्या संघाने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग तसेच, महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशभरातून एकूण ३७ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने २० ते २३ डिसेंबर या कालावधीत यशदा, बाणेर रोड, पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या या कला उत्सव स्पर्धेत एकूण १२ कलाप्रकार समाविष्ट होते. त्यामध्ये लोकसंगीत समूह वाद्यवादन या कलाप्रकारात शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण च्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला. राष्ट्रीय स्तरावर एकूण ३७ संघ संपूर्ण भारतातून या स्पर्धेसाठी समाविष्ट झाले होते.
या वादन समूहामध्ये आर्या मोसमकर, आयुष मांगले, सुमित ठोसर व वंश कानडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. जिल्हा, विभाग, राज्य या सर्व स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून हा संघ राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला होता. या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभामध्ये भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, एनसीईआरटीचे संचालक दिनेश सकलानी, महाराष्ट्र सरकारच्या शालेय आणि क्रीडा मंत्रालयाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, यशदाचे संचालक डॉ. सुधांशू, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर, कमलादेवी आवटे, उपसंचालक अरुण जाधव आदी उपस्थित होते. खारेपाटण प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे, प्रशालेचे माजी विद्यार्थी मयूर जाधव, अक्षय कांबळे, धनंजय मोसमकर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे एस्कॉर्ट टीचर म्हणून मनोहर म्हात्रे व सौ. वैशाली काकडे (मुंबई) यांनी चोख कामगिरी बजावली.
---
खारेपाटण पंचक्रोशीत कौतुक
सर्व यशस्वी विद्यार्थी व संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक संतोष राऊत, खारेपाटण पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.