नाशिक: गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर अखेर ठोस आणि कायमस्वरूपी उपाय होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौकात अंडरपाससह मोठ्या सुधारणा करण्यासाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीस केंद्रीय मान्यता मिळाली आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती ‘एक्स’ माध्यमातून जाहीर केली. वाहतूक कोंडी संदर्भात ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या द्वारका चौकात सहा प्रमुख रस्ते एकत्र येत असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी पादचारी मार्ग, सर्कलचा आकार कमी करणे, अतिक्रमण हटाव मोहीम, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या; मात्र अपेक्षित दिलासा मिळाला नाही.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी स्थळ पाहणी केली होती. त्यानंतर नागपूर येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेच्या वाहतूक शाखेने केलेल्या सखोल सर्वेक्षणानंतर अंतिम आराखड्यावर शिक्कामोर्तब झाले.
आठशे मीटरचा अंडरपास; तीनशे मीटरचे दोन भुयारी मार्ग
प्रकल्प विकास आराखड्यानुसार सारडा सर्कल ते नाशिक रोड या मार्गावर ८०० मीटर लांबीचा अंडरपास उभारण्यात येणार असून, दोन्ही बाजूंची वाहतूक त्यातून सुरू राहणार आहे. सध्या असलेला पादचारी अंडरपास काढण्यात येणार आहे. नाशिक रोडमार्गे धुळे दिशेने जाण्यासाठी वडाळा नाका सिग्नलजवळ ३०० मीटरचा अंडरपास उभारला जाणार असून, तो पुढे उड्डाणपुलाला जोडला जाईल. तसेच धुळे ते नाशिक रोड या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठीही ३०० मीटरचा स्वतंत्र अंडरपास प्रस्तावित आहे.
Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडीकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच नाशिकमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी द्वारका चौक सुधारणेसाठी २१४ कोटी रुपयांच्या तरतुदीसह प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमधील वाहतूक सुरळीत होऊन मालवाहतूक व सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री
द्वारका चौक सुधारणा प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. ते सकारात्मक होते. द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक