Nashik Traffic Safety : नाशिकमधील अपघातांना बसणार लगाम; महापालिकेची 'ब्लाइंड स्पॉट' निर्मूलन मोहीम!
esakal December 29, 2025 06:45 AM

नाशिक: रस्त्याने चालताना सुरक्षितता वाढविण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्यासह अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने डाव्या वळणावरील ‘ब्लाइंड स्पॉट’ निर्मूलन करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी कोलकता, दिल्ली, भोपाळ या शहरांतील वाहतुकीचा आढावा घेण्यात आला.

सन २०२४–२५ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर सर्वेक्षण करण्यात आले. अडथळे हटवून आवश्यक संरचनात्मक सुधारणा केल्यास गंभीर अपघातांमध्ये २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरील डाव्या वळणांची पाहणी केली.

डाव्या वळणांवर दृश्यता कमी करणारे अतिक्रमण, अनियमित पार्किंग, फलक, बांधकाम साहित्य आदी भौतिक अडथळ्यांची नोंद घेऊन तातडीने ब्लाइंड स्पॉट हटविण्याच्या व वळण मोकळे करण्याच्या सूचना दिल्या. त्र्यंबक रोडवरील शरणपूर पोलिस स्टेशन परिसरात डाव्या वळणावरील ब्लाइंड स्पॉट दूर करण्याची उपाययोजना प्रस्तावित केली.

दिंडोरी रोडवरील मेरी इन्स्टिट्यूट परिसरात डाव्या वळणावर पुरेशी दृश्यता उपलब्ध होण्यासाठी संबंधित भिंत आतील बाजूस हलविली जाणार आहे. त्र्यंबक रोड व दिंडोरी रोडवरील एकूण सुमारे ४० डाव्या वळणांवर असलेले ब्लाइंड स्पॉट ओळखून ते टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे नियोजन आहे.

प्रस्तावित उपाययोजना

नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.

जनजागृती व माहिती-शिक्षण-संवाद उपक्रम.

वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता.

रस्त्याचे फॅनिंग व रुंदीकरण.

अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणे दूर करणे.

अडथळा ठरणाऱ्या भिंती व संरचना हटविणे.

दृश्यता सुधारण्यासाठी भौतिक अडथळे हटविणे.

ट्रॅफिक वॉर्डन संकल्पनेद्वारे वाहतूक शिस्त व जनजागृती.

Malvan News : मालवण पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’; सरत्या वर्षाला निरोप, सलग सुट्यांमुळे गर्दी वाढली

डाव्या वळणावरील ब्लाइंड स्पॉट केवळ वाहतूक समस्या नसून ती जीवित सुरक्षेशी संबंधित आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवरील अशा अपघातप्रवण ठिकाणी महापालिकेच्या वतीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्या जातील.

- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.