भोसरी, ता. २८ : ‘‘पक्षाशी एकनिष्ठा ठेवली. मात्र, आयात केलेल्या उमेदवाराला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काहीही झाले, तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवायचीच,’’ असा शड्डू पक्षाने इच्छुकांनी ठोकला आहे. त्यामुळे महापालिकेची ही निवडणूक चुरशीची होणार, अशी चर्चा सध्या भोसरी परिसरात रंगली आहे.
आपल्या पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणारे पदाधिकारी-कार्यकर्ते यांना निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची आशा आहे. मात्र, राजकीय पक्षांनी इतर पक्षांतील प्रभावी नेत्यांची ‘आयात’ करत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील एकनिष्ठांनी संताप व्यक्त केला आहे. अद्यापपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. मात्र, काहींना पक्षांच्या वरिष्ठांनी खासगीत उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितल्याने त्या उमेदवारांनी प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, त्याच प्रभागातील इच्छुकांनीही प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते अजूनही भोसरीतील काही प्रभागांत उमेदवारी देण्याविषयी विचार करत आहेत. त्यामुळे ऐनवेळी पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी दिली गेल्यास पक्षातील आयारामांची गोची होणार असल्याचे चित्र आहे.
प्रभागातील बदलती समीकरणे
भोसरीतील काही प्रभागातील प्रभावशील राजकीय नेते, माजी नगरसेवक पक्षांतर करत आहेत. या पक्षांतरामुळे प्रभागातील उमेदवारांची समीकरणे दररोज बदलताना दिसत आहेत. ३० डिसेंबर उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच प्रभागातील लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
आता नाही तर कधीच नाही
निवडणुकीत तिकीट नाकारली जाण्याची शंका असलेल्या इच्छकांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच, असा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुक उमदेवार राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची वाट पहात आहेत. असे असतानाही हे उमेदवार मोठ्या प्रमाणात २९ डिसेंबरपर्यंत उमेवारी अर्ज भरून मंगळवारपर्यंत (ता.३०) पक्षाचा अधिकृत उमेवारीसाठी असणारा ‘एबी’ अर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काही इच्छुकांमधून सांगितले जात आहे.
राजकारणात वर्तमानच महत्त्वाचा
‘‘सध्या सर्वच राजकीय पक्षांतील घडामोडी पाहता सत्तेसाठी कोणता पक्ष ऐनवेळेस कोणती भूमिका घेईल; हे सांगता येत नाही. राजकारणात भविष्यकाळ नाही; तर वर्तमानकाळच महत्त्वाचा आहे,’’ असे काही इच्छुकांद्वारे बोलून दाखविले जात आहे. राजकारणात उद्या कोणती नवीन समीकरणे निर्माण होतील, हे कोणालाही सांगता येत नसल्याने पक्षाने बंडखोरी करू नये, यासाठी दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न तिकीट नाकारलेल्या काही इच्छुकांमधून विचारला जात आहे.
अंतिम दहा दिवसांत उडणार धुरळा
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख दोन जानेवारी आहे. सध्या इच्छुकांद्वारे घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. मात्र दोन जानेवारीनंतर पक्षातील अधिकृत उमेदवारांच्या लढतीबरोबरच बंडखोरीचेही चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तीन जानेवारीपासून खऱ्या अर्थाने एकमेकांवरील आरोपांचा, राजकीय नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार असल्याचे चित्र आहे.