कळस, ता. २८ : आंबा खरेदी करून त्याचे पैसे न देता शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या जब्बार बाबूलाल बागवान या व्यापाऱ्याला बारामतीचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. बी. जाधव यांनी दोषी ठरवत सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, आरोपीला १ लाख ७५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, ही रक्कम तक्रारदार शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राजवडी (ता. इंदापूर) येथील बाळासाहेब कोकणे यांनी आपल्या एक एकर आंबा बागेतील सुमारे २ टन केशर आंबा व्यापारी जब्बार बागवान याला २०१९ मध्ये विकला होता. या व्यवहारापोटी बागवान याने कोकणे यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो धनादेश बँकेत वटला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने कोकणे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणी अॅड. अमोल ओमासे यांनी शेतकरी बाळासाहेब कोकणे यांच्यावतीने प्रभावीपणे बाजू मांडली. यासाठी अॅड. विजयसिंह मोरे, अॅड. शैलेश गायकवाड, अॅड. अभिषेक पालवे यांनी त्यांना साहाय्य केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून, न्यायालयाने व्यापारी जब्बार बागवान याला दोषी ठरवले. दंडाची रक्कम न भरल्यास व्यापाऱ्याला अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.