तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. दुसरीकडे पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे.
पुढे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसीसाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या मुदतीत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. १ एप्रिलनंतर ई-केवायसी न केलेल्यांचा लाभ बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयोगाकडे विचारणा नाही, तरी लाभ थांबला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना शासन निर्णयानुसार दरमहा १० तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या नोव्हेंबर संपला, आता डिसेंबरही संपत आला तरीदेखील लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे लाभ वितरीत करायला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेचा अडथळा आहे का, याबद्दल देखील आयोगाकडे विचारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
दोन महिन्यांचा एकत्रित मिळू शकतो लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे ३५ टक्के लाभार्थी ई-केवायसी करायचे राहिले आहेत. ई-केवायसीसाठी आता दोन दिवसच मुदत राहिली असून लाभार्थींना त्यासाठी मुदतवाढ मिळेल. दुसरीकडे लाभार्थी महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ एकत्रितपणे वितरीत होऊ शकतो.
- किरण जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची स्थिती
सुरवातीचे लाभार्थी
११.०९ लाख
दरमहा लाभाची रक्कम
१६६.३५ कोटी
सध्याचे अंदाजित लाभार्थी
९.१३ लाख
१३६.९५ कोटी
‘ई-केवायसी’ केलेले लाभार्थी
७ लाख