तात्या लांडगे
सोलापूर : मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप हे सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पण, यंदाच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस, माकप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत लढत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. भाजपच्या दोन्ही ज्येष्ठ आमदारांची नाराजी, पक्षातील इच्छुकांपेक्षा आयारामांनाच संधी देण्याची भूमिका, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घ्यावी लागली. या निवडणुकीत अनेकांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे दिसून आले.
सोलापूर नगरपालिका १८६० मध्ये स्थापन झाली. देशातील सर्वात जुनी नगरपालिका आहे. १९६३ मध्ये महापालिका झाल्यावर सर्वाधिक काळ महापालिकेची सत्ता काँग्रेसच्याच हाती राहिली. पण, मागच्यावेळी महापालिकेवर भाजपची सत्ता आली. आता देखील राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजपला विजयाची खात्री आहे. दरम्यान, या निवडणुकीत सध्या भाजपकडून ११००, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ३५०, शिवसेनेकडून ३०० तर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांकडून सुमारे ७०० उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
इच्छुकांची संख्या महायुतीतील भाजपकडे सर्वाधिक असल्याने त्यांच्यात नाराजी अधिक आहे. तर त्या नाराजांना विरोधकांनी उमेदवारी देऊ नये म्हणून भाजपने अद्याप उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. कधीकाळी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच होत होती, पण यंदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही माजी नगरसेवक फिरदोस पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकला.
‘या’ बाबी पहिल्यांदाच घडल्या...
१५ डिसेंबर रोजी महापालिका निवडणूक जाहीर झाली. भाजपकडून निवडणूक लढण्यास ११०० इच्छुकांनी दिल्या मुलाखती. ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांच्या मुलाखती घ्यायला अनेकांचे कार्यकर्ते होते. तेव्हापासून भाजपमधून निघू लागला नाराजीचा सूर. शहर उत्तरचे भाजपचे माजी मंडल अध्यक्ष बिपिन धुम्मा यांनी पक्षनिष्ठ म्हणून मला उमेदवारी न दिल्यास जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी भूमिका मांडली आणि पक्षातील धुसफूस बाहेर निघाली.
पहिल्यांदा गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांनी शिवसेनेत, नगरसेवक विनोद भोसले, सुशील बंदपट्टे यांनी भाजपत, फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.
पक्षातील कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही माजी आमदार दिलीप माने यांना भाजपत प्रवेश देण्यात आला. कार्यकर्त्यांसाठी आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख नाराज झाले. पक्षाअंतर्गत कुरघोड्यांमुळे विजयकुमार देशमुख यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली. तत्पूर्वी, पक्षाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना महापालिकेसाठी समन्वयक म्हणून नेमले, पण त्यांनी ३० तासांतच राजीनामा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे पदाधिकारी किसन जाधव, नागेश गायकवाड यांनी अचानक रात्री बारा वाजता भाजपमध्ये प्रवेश केला. यू. एन. बेरिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तत्पूर्वी, आनंद चंदनशिवे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षातील पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांविरुद्ध उपोषण केले.
स्वबळाच्या तयारीतील भाजपने शिवसेनेसोबत युतीचा हात पुढे केला. पण, सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती केली. स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेत ३५० हून अधिक जणांच्या मुलाखती घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेसोबत युती केली.