कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू, तिच्या दुधापासून बनवलेला रायता; उत्तरकार्यात जेवलेले २०० जण धावले दवाखान्यात
esakal December 29, 2025 08:45 PM

उत्तर प्रदेश: एका दुभत्या म्हशीला कुत्रा चावल्यानं गावातील तब्बल २०० जणांनी रेबिजची लस घेतल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशातील बदायूँ इथं ही घटना घडलीय. बदायू जिल्ह्यातल्या उझानी इथं कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू झाला. या म्हशीचं दुधापासून बनवलेल्या दह्याचा वापर केलेला रायता गावातील लोकांनी खाल्ला होतं. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेवटी सर्व गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले आणि खबरदारी म्हणून रेबिजची लस टोचून घेतली.

उझानी इथल्या पिपरौल गावात २३ डिसेंबरला एका व्यक्तीच्या उत्तरकार्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता. यात सर्व गावकरी जेवायला आले होते. जेवणात रायताही होता. जेवणानंतर चार दिवसांनी अशी माहिती समोर आली की ज्या म्हशीच्या दुधापासून दही बनवलेलं आणि त्याचा रायता केलेला त्या म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्यानं चावा घेतला होता. म्हशीचा २६ डिसेंबरला मृत्यू झाल्याचं कळलं. यानंतर आपल्यालासुद्धा रेबिज होईल या भीतीनं गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला.

भुस्सा भरलेला ट्रक उलटल्यानं बोलेरोचा चुराडा, चालकाच्या डोक्याचा चेंदामेंदा; अपघाताचा VIDEO आला समोर

गावकऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी आणि रविवारी गावातील लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. गावातील महिला जशोदा देवी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, गावात उत्तरकार्याच्या जेवणाचं आमंत्रण होतं. यात जेवणाच्या मेन्यूमध्ये रायता होता. सगळ्यांनीच रायता खाल्ला होता. पण नंतर म्हशीचा मृत्यू झाल्याचं आणि तिला कुत्रा चावला होता हे समजलं. यामुळे घाबरलेल्या लोकांनी लस घेतली.

गावकऱ्याने सांगितलं की, म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. पण त्याची माहिती नसल्यानं त्याच म्हशीच्या दुधाचं दही बनवून रायता केला होता. उत्तरकार्यात सर्वांनीच तो रायता खाल्लेला. पण दोन दिवसांनी म्हशीचा मृत्यू झाल्यानं सगळेच घाबरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.