एशेज कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामना दरवर्षीप्रमाणे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवला गेला. हा सामना अवघ्या दोन दिवसातच संपल्याने क्रीडा जगतात चर्चांना उधाण आलं. दोन दिवसात 36 विकेट पडल्या आणि हा सामना इंग्लंडने आपल्या खिशात घातला. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या विजयानंतर 1-3 अशी स्थिती आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला असला तरी ऑस्ट्रेलिया या आधीच मालिका जिंकली आहे. पण सामन्यातील खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने याने सामन्यानंतर ताशेरे ओढले. खेळपट्टीवर बेन स्टोक्सने खडे बोल सुनावले होते. इतकंच काय तर दिग्गज क्रिकेटपटूंनी या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयसीसीने या खेळपट्टीची दखल घेतली आहे. आयसीसीने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या खेळपट्टीला रेटींग दिलं आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
आयसीसीने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या खेळपट्टीला निराशाजनक म्हंटलं आहे. त्यामुळे या खेळपट्टीनंतर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. एमसीजीतील सामन्याला पाहून पिच क्यूरेटरला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने खेळपट्टीबाबत सांगितलं की, ‘मला कसोटीच्या पहिल्या दिवसानंतर धक्का बसला होता. हा सामना फक्त दोन दिवसच चालल्याने आम्ही खूश नव्हतो. हा कसोटी सामना रोमांचक होता मात्र लांब चालला नाही. आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि पुढच्या वर्षी सर्वकाही ठीक करण्याचा प्रयत्न करू. मी यापूर्वी कधीही अशा कसोटी सामन्यात सहभागी झालो नाही आणि भविष्यात पुन्हा सहभागी होणार नाही अशी आशा आहे.’
पिच क्युरेटरने खेळपट्टीबद्दल सांगितले की, “आम्ही गवत जास्त सोडले कारण आम्हाला माहित होते की हवामान अधिक गरम होणार आहे आणि आम्हाला त्याची आवश्यकता असेल. तथापि, मागे वळून पाहताना असे दिसते की पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना खूप मदत केली. जर कसोटी दुसऱ्या दिवशी संपली नसती तर पुढील दोन दिवस खेळपट्टी खूपच चांगली असती.” ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 152 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 110 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 42 धावांची आघाडी होती. तर दुसऱ्या डावात 132 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावा दिल्या. या धावा इंग्लंडने 6 विकेट गमवून 178 धावा केल्या.