गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू अखेर आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता राज ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा येथे मनसेचा विशेष मेळावा जाहीर केला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीवर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. “युती झाली असली तरी काही जागांवरून तिढा कायम आहे, मात्र मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी हे जागावाटप अत्यंत क्षुल्लक आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी जागावाटपापेक्षा विजयाला प्राधान्य द्या, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले.
आता एकजुटीने मैदानात उतरले पाहिजेराज ठाकरे यांनी नुकतंच मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीमध्ये जागांच्या आकड्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत स्वत: राज ठाकरे यांनी दिले. “कुणाला किती जागा मिळाल्या हे पाहण्यात वेळ वाया घालवू नका. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. संकट नीट ओळखा, जर आपण आज गाफील राहिलो तर मुंबई आपल्या हातातून जाईल. दुसऱ्यांची वाईट स्वप्ने गाडण्यासाठी आपण सर्वांनी आता एकजुटीने मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी दिले.
यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. आज ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज सुरू आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याकडे सत्ता नसली तरी आपला दबदबा आजही कायम आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला.
मी सर्व गोष्टी पुराव्यासकट बाहेर काढणारआज उमेदवारांना फॉर्म दिले जातील, ते पूर्ण उत्साहात आणि जल्लोषात भरा. ही तर फक्त सुरुवात आहे, प्रत्यक्ष प्रचारसभेत मी सर्व गोष्टी पुराव्यासकट बाहेर काढणार आहे.” असा कानमंत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या मेळाव्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर किंवा एकाच उद्देशाने एकत्र आल्याने मराठी मतांचे विभाजन थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.