Shafali verma : शफाली वर्माच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, लेडी सेहवागला फक्त 43 धावांची गरज
GH News December 29, 2025 11:11 PM

वूमन्स टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर 2025 या वर्षातील शेवटच्या आणि टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडीवर आहे. भारतीय महिला संघाने रविवारी 28 डिसेंबरला श्रीलंकेवर 30 धावांनी मात करत विजयी चौकार लगावला. आता टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला 5-0 ने क्लिन स्वीप करण्यासाठी उतरणार आहे. तर दुसर्‍या बाजूला श्रीलंकेचा हा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

उभयसंघातील या पाचव्या सामन्यात टीम इंडियाची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. शफाली वर्मा हीने पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता त्यानंतरच्या तिन्ही सामन्यात धमाका केलाय. शफाली पहिल्या सामन्यात 9 धावांवर आऊट झाली. मात्र त्यानंतर शफालीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात सलग अर्धशतक झळकावलं. आता शफालीला अंतिम सामन्यात हाच तडाखा कायम ठेवत 2025 या वर्षात सर्वाधिक टी 20i धावा करणारी (Full Members Team) महिला फलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. शफालीने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 79 धावांची खेळी केली. शफालीची ही या मालिकेत सलग 50 पेक्षा अधिक धावा करण्याची तिसरी वेळ ठरली. शफाली या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.

शफालीने या मालिकेत आतापर्यंत 4 टी 20i सामन्यांमध्ये 118 च्या सरासरीने आणि 185.83 च्या स्ट्राईक रेटने एकूण 236 धावा केल्या आहेत. तसेच शफाली या मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारी एकमेव फलंदाज आहे. शफालीनंतर स्मृती मंधाा ही या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. स्मृतीने 4 सामन्यांमध्ये 120 धावा केल्या आहेत.

शफालीची 2025 मधील कामगिरी

दरम्यान शफालीने 2025 या वर्षात टी 20i क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शफालीने 9 सामन्यांमध्ये 58.85 च्या स्ट्राईक रेटने एकूण 412 धावा केल्या आहेत. तर 2025 या वर्षात आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी 20i धावांचा विक्रम हा आयर्लंडच्या गॅबी लुईस हीच्या नावावर आहे. गॅबीने 454 धावा केल्या आहेत. गॅबीने 13 टी 20i सामन्यांमधील 11 डावांत 50.44 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

शफालीला किती धावांची गरज?

आता शफालीला आयर्लंडच्या या महिला फलंदाजाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 43 धावांची गरज आहे. त्यामुळे शफालीने पाचव्या सामन्यात सलग चौथं अर्धशतक झळकावतं हा रेकॉर्ड ब्रेक करावा, अशी आशा चाहत्यांना आहे. त्यामुळे शफाली पाचव्या टी 20i सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.