इंग्लंड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिष्ठेची एशेज सीरिज अवघ्या 11 दिवसांतच गमावली. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला सलग आणि पहिल्या 3 सामन्यांत पराभूत करत ही मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 11 दिवसांतच जिंकली. त्यानंतर इंग्लंडने मालिका गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये (Boxing Day Test) धमाका केला. इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (MCG) ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडवत मालिकेत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे आता इंग्लंड या मालिकेत 1-3 ने पिछाडीवर आहे.
आता इंग्लंडचा पाचवा आणि अंतिम सामना जिंकून नववर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचं आव्हान असणार आहे. अशात इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडच्या आणखी एका गोलंदाजाला एशेज सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे गसला अंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे. गस दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर होणारा इंग्लंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. गसआधी जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड या दोघांनाही या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं.
पाचवा आणि अंतिम सामना कुठे?ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना 4 ते 8 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड या सामन्यात 3 प्रमुख गोलंदाजांशिवाय कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गसची एशेज सीरिजमधील कामगिरीगसने या मालिकेतील चौथ्या सामन्यात एकूण 3 विकेट्स घेतल्या. गसने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 1 अशा विकेट्स मिळवल्या. गसने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्या एशेज सीरिजमध्ये एकूण 6 विकेट्स मिळवल्या. आता गसच्या अनुपस्थितीत पाचव्या कसोटीत जोश टंग आणि ब्रायडन कार्स या दोघांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा WTC 2025-2027 साखळीतील पहिला पराभवदरम्यान इंग्लंडने मेलबर्नमध्ये विजय मिळवत कांगारुंचा विजयरथ रोखला. ऑस्ट्रेलियाचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील हा पहिला पराभव ठरला. ऑस्ट्रेलियाने त्याआधी 6 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला होता. मात्र ऑस्ट्रेलिया या पराभवानंतरही डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर इंग्लंड सातव्या स्थानी आहे.