हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
Tv9 Marathi December 30, 2025 01:45 AM

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान… उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भुरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 6 फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.

किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा

या डॉ. जयभीम शिंदे लिखित शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केलं आहे.

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोडा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर हे उत्तर मिळालं आहे. ‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात कॉलेज विश्वातल्या दुनियादारीच्या अत्यंत वेगळ्या पण तितक्याच भावस्पर्शी गोष्टी पहायला मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.