VHT 2025 : बिहारने 8 गडी राखून मिळवला विजय, वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत 310 च्या स्ट्राईकने केल्या धावा
GH News December 30, 2025 01:11 AM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत बिहार आणि मेघालय हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बिहारच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेघालयने 50 षटकात 9 गडी गमवून 217 धावा केल्या आणि विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बिहारने 32.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. यासह बिहारने प्लेट गटात सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातही वैभव सूर्यवंशीने प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. त्याच्या आक्रमक सुरुवातीमुळे बिहारला चांगली सुरुवात मिळाली. पुन्हा एकदा त्याच्या खेळीमुळे बिहारने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अडचणीत आणलं. पण मोठी खेळी करण्यात अपयश आलं. वैभव सूर्यवंशीने मेघालयविरूद्द 10 चेंडूत 31 धावा केल्या आणि बाद झाला. यात त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. 310 च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीत मेघालयचा गोलंदाज आकाश कुमार गोलंदाजी करत होता आणि वैयक्तिक दहावा चेंडू खेळताना वैभवने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू दीप्पूच्या हाती गेला आणि विकेट गेली. पण संघाचा विजय मिळवून देण्यात पियुष सिंह आणि आकाश राज यांनी हातभार लावला. पियुष सिंहने 88 चेंडूत 14 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. तर आकाश राजने 90 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत अरूणाचल प्रदेशविरुद्ध 84 चेंडूत 190 धावा ठोकल्या होत्या. यात 16 चौकार आणि 15 षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने 397 धावांनी विजय मिळवला होता.

वैभव सूर्यवंशीची अंडर 19 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. यापूर्वी आशिया कप स्पर्धेत अंडर 19 संघाकडून खेळला आहे. यात त्याने युएईविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याने 95 चेंडूत 171 धावा केल्या होत्या. आता त्याच्याकडून अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. त्याचा फॉर्म पाहता प्लेइंग 11 मध्ये त्याचं स्थान पक्कं असल्याचं दिसत आहे. त्याने आयपीएल 2025 स्पर्धेतील 7 सामन्यात एकूण 252 धावा केल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.