पुणे : ‘‘ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे. हा पक्ष महाविकास आघाडीसोबत राहील, असा विश्वास पुणेकरांना होता. मात्र त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे, अशी नाराजी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी व्यक्त केली. तर शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची अधिकृत घोषणा आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
काँग्रेसचे प्रभारी आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी सोमवारी (ता.२९) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, आदित्य शिरोडकर, रघुनाथ कुचिक आणि प्रशांत बधे यावेळी उपस्थित होते. आघाडीतील १०० जागांवर एकमत झाले आहे. त्यातील काँग्रेसला ६० आणि शिवसेनेला ४० जागा ठरल्या आहेत. तेथील उमेदवारांना पक्षांतर्फे एबी फॉर्म देण्यात येत आहेत.
Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी पुणे पोलिसांची पाच हजार गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई!आघाडीतील मनसेच्या सहभागाबाबत विचारले असता अहीर म्हणाले, ‘‘शिवसेना ही मनसेसोबत चर्चा करत आहे. मनसेने ३२ जागांची यादी दिली आहे. त्यातील २१ जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्याच चर्चा होऊन जागा वाटप करण्यात येत आहे. समविचारी पक्षांशी चर्चा करून दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातील जागा त्यांना देणार आहेत. त्याबाबत चर्चा सुरू असल्याने उर्वरित जागांवर अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.’’
आघाडीतील वंचितच्या सहभागाबाबत विचारले असता सतेज पाटील म्हणाले, ‘‘त्यांचा प्रस्ताव आला असून त्याबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नेते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चर्चा करून शंभर जागांचा निर्णय घेतला आहे.’’ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीविषयी ते म्हणाले, ‘‘त्यांच्यासोबत दोनवेळा चर्चा झाली. मी स्वतः अंकुश काकडे यांच्याशी बोललो. ते नंतर चर्चेला आले नाहीत. त्यामुळे आम्ही दोन पक्षांत जागा वाटप केले. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.’’
विरोधकांची जागा ठेवायची नाही
मंत्रीमंडळात एकत्र बसणारे लोक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतात. त्यामुळे, विरोधी पक्षाला जागाच मिळू नयेत, असे त्यांचे नियोजन होते. पुण्यात काँग्रेस आणि शिवसेनेने सक्षम पर्याय दिला आहे. पिंपरी -चिंचवडलाही दोन्ही पक्षांची बैठक घेत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे अधिक लक्ष देणार आहेत. पुण्यात आम्ही सभेऐवजी रॅलीवर भर देणार आहोत, असे अहीर यांनी सांगितले.
Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'जाहीरनामा पाच जानेवारीला
येथील नागरी समस्या सोडविण्याला आमचे प्राधान्य असून, त्याबाबतचा जाहीरनामा चार किंवा पाच जानेवारीला प्रसिद्ध करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले. अपुरा पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी, हिंजवडीतील वाहतूक समस्या, नवले पुलाजवळील अपघात, वाढती गुन्हेगारी, कोयता गॅग असे अनेक प्रश्न शहरात आहेत. सत्ताधारी पक्षाला या समस्या सोडवता आलेल्या नाहीत, असे ते म्हणाले.