नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या पाच दुभत्या म्हशी व एका शेतकऱ्याचा बैल चोरी करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांना पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली.आरोपीकडून पाच दुभत्या म्हशी व वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप जीप असा एकूण ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
याप्रकरणी नरेश भाऊ मोरे (वय ३९ ), सुरज अशोक पारधी( वय १९, दोघेही राहणार कळंबड, ता. मुरबाड, जि.ठाणे ) यांना अटक केली आहे. जुन्नर उपविभाग परिसरातील बेल्हा,आणे,आंबेगव्हाण, या गावातील चार शेतकऱ्यांच्या पाच दुभत्या म्हशी व ओझर येथील शेतकऱ्याचा एक बैल मागील काही महिन्यात चोरीला गेला होता. याप्रकरणी जुन्नर, आळेफाटा, ओतूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुभती जनावरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
Crime News : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत नोकरी लागल्याचं कारण सांगून तिला नेलं अन् तिच्यासोबत...या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकाने 120 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.तपासात चोरीचे वाहन माळशेज घाटातून जात असल्याचे निष्पन्न झाले.पिकअप वाहनात म्हैस घेवून विक्री साठी जात असताना 24 डिसेंबर 2025 रोजी पोलीस पथकाने आरोपींना सापळा रचून खुबी गावचे जंगलाजवळ मुद्देमालासह ताब्यात घेतले. आरोपीकडून पाच म्हैस व वाहतुकीसाठी वापरलेली जीप ताब्यात घेतली. जप्त केलेल्या म्हैस शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या.
पुढील तपासात पाळीव जनावरांचे नऊ गुन्हे आरोपींवर दाखल असल्याचे निष्पन्न झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,लहू थाटे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदीप वारे, राजु मोमीण, अक्षय नवले,नदीम तडवी, दिनेश साबळे, रोहित बोंबले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आणि पोलीस चहा प्यायले
दोन म्हशी चोरीला गेल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विठ्ठलवाडी येथील युवराज खंडागळे यांच्या घरी चौकशीला गेले होते. त्यावेळी चहा घेण्याची विनंती खंडागळे यांनी केली होती. चोरीला गेलेल्या म्हशी शोधून आणू अन त्याच म्हशीच्या दुधाचा चहा पिऊ असा शब्द पोलिसांनी दिला होता. दिलेला शब्द पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर पोलीस खंडागळे यांच्या घरी चहा प्यायले.