लोकसेवा करताना पदांपेक्षा कामाला अधिक महत्त्व
esakal December 30, 2025 07:45 AM

लोकसेवा करताना पदांपेक्षा कामाला अधिक महत्त्व
आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन; रोठ बुद्रुक येथे मोफत सायकलवाटप
रोहा, ता. २९ (बातमीदार) : राजकारण करताना केवळ पदे, सत्तास्थाने किंवा मान-सन्मान यांना महत्त्व न देता समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट यांना प्राधान्य दिले पाहिजे. लोकसेवेत पदांपेक्षा काम अधिक महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
रोठ बुद्रुक येथे मैत्री प्रतिष्ठान व शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गावातील ३५ विद्यार्थ्यांना मोफत सायकलवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी नितीन वारंगे यांचे उदाहरण देत सांगितले की, सामान्य कार्यकर्ता असतानाही त्यांनी पदाच्या मागे न लागता लोकहिताची कामे प्राधान्याने केली. युतीच्या माध्यमातून या गावात सातत्याने जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न सुरू असून, ग्रामपंचायत पातळीवरील विविध विकासकामे, मंदिर उद्घाटन तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांशी थेट नाळ जोडली जात असल्याचे आमदार दळवी यांनी सांगितले. राजकारणातील अनेक प्रश्न हे चर्चा व संवादातूनच सुटू शकतात. मतभेद असले तरी संवाद कायम ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. रोहा नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी जनतेची साथ आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते दिलीप उर्फ छोटम भोईर, तालुकाप्रमुख अॅड. मनोजकुमार शिंदे, भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, उपतालुकाप्रमुख संदेश मोरे, उद्देश वाडकर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, सुरेश महाबळे, महेश खांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.