मळगाव हायस्कूलचे सुवर्ण वैभव जपा
esakal December 30, 2025 11:45 AM

14168

मळगाव हायस्कूलचे सुवर्ण वैभव जपा

बी. एस. मुळीक ः माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

सावंतवाडी, ता. २९ ः मी या शाळेचा विद्यार्थी आणि शिक्षकही राहिलो आहे. सध्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, माजी विद्यार्थ्यांनी या कार्यात सढळ हाताने मदत करून शाळेचे सुवर्ण वैभव जपावे, असे आवाहन मळगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. एस. मुळीक यांनी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात केले.
मळगाव येथील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या ‘मळगाव इंग्लिश स्कूल’चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवारी झाला. गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. माजी विद्यार्थी परिवाराचे उपाध्यक्ष प्रभाकर तेली यांनी मेळाव्यामागची भूमिका मांडली. सचिव महेश गावकर यांनी प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षकांसह शाळेच्या पहिल्या पिढीतील म्हणजेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील १० ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला. तसेच एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अमिषा तिवरेकर हिचा माजी सभापती रमेश गावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी सूर्यकांत सांगेलकर यांनी असे मेळावे दरवर्षी व्हावेत, अशी भावना व्यक्त केली.
माजी शिक्षक जे. एन. प्रियोळकर, बी. एल. सामंत, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, प्रमिला राणे-सावंत, शशिकांत साळगावकर, बी. एस. मुळीक, माजी शिक्षक सुनील कदम, संस्था खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, मुख्याध्यापक एम. बी. फाले, निवृत्त कर्मचारी विलास जाधव, काका बोंद्रे, बाळा जाधव, विजया पंतवालावलकर, माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, खजिनदार भाऊ देवळी, गुरुनाथ नार्वेकर, हेमंत खानोलकर आदी उपस्थित होते. मनीषा नाटेकर-राऊळ यांनी सूत्रसंचालन केले.
----
‘गुरुवंदना’ सोहळा ठरला मुख्य आकर्षण
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे ‘गुरुवंदना’ सोहळा. शाळेत आजवर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. माजी शिक्षक जयप्रकाश प्रियोळकर म्हणाले, ‘आजारापणामुळे घराबाहेर पडणे कठीण होते, तरीही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मी आलो. आजच्या युगात सामान्य ज्ञान आणि वाचन संस्कृती जपली पाहिजे. विद्यार्थ्यांनी विनम्रता राखावी आणि पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.