रत्नागिरी ः अंगणवाडीतील मुलांना शिकवणार प्राथमिक शिक्षक
esakal December 30, 2025 11:45 AM

अंगणवाडीतील मुलांना शिकवणार प्राथमिक शिक्षक
आठवड्यातील एक दिवसाचे नियोजन; शिक्षणाचा पाया होणार भक्कम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः अंगणवाडीतील मुलांचे पायाभूत शिक्षण मजबूत करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातून किमान एक दिवस त्यांच्या शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील अंगणवाडीत जाऊन शिकवावे लागणार आहे. यासाठी शासनाने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षकांनाही बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांनाही शिक्षिकेचा दर्जा मिळणार आहे.
अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणे, प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढवणे या हेतूने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणे व मुलांना शिकवण्याचे शैक्षणिक धोरण आखले आहे. यामुळे अंगणवाडीतील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार असून, प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीच्या शिक्षणात योगदान द्यावे लागणार आहे. अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामात शिक्षकांची मदत मिळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी (पूर्व प्राथमिक) व पहिला वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षक अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजात मदत करणार आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अंगणवाडीतील मुलांना शिकवावे लागणार आहे.

चौकट
शिक्षण विभागाचे पत्र
अंगणवाडीतील मुलांसाठी विद्याप्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागणार असून, शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.