Kolhpur Election : अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ३६, शिवसेना ३०, राष्ट्रवादी १५ जागांवर मैदाना
esakal December 31, 2025 08:45 AM

कोल्हापूर : आठवड्याभराच्या चर्चेचे गुऱ्हाळानंतर आज महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरला. यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी ३६, शिवसेना शिंदे गटासाठी ३०, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना १५ जागा दिल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यावेळी वरिष्ठांच्या निर्णयानंतर मंगळवारी (ता.३०) सकाळी नावांची यादी जाहीर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह तीनही पक्षांचे पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Kolhapur Election : वेगवेगळ्या सूचनांनी उमेदवारी अर्जांचा खेळखंडोबा; उमेदवारांची धावपळ सुरू

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत मॅरेथॉन बैठका होत होत्या. त्यामध्ये उत्सुकता वाढत होती. अनेक इच्छुकांना उमेदवारी देता आली नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

याचवेळी कोल्हापूरकरांच्या अपेक्षापूर्तीसाठी आम्ही महायुती म्हणून एकत्र आलो आहोत. कोल्हापूरकरांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. ‘राईट व्हिजन’ घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. येत्या पंधरा जानेवारीला शहरवासीयांचा कौल आम्हालाच मिळेल.’

Kolhapur Election : उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षांत बंडखोरी उफाळली; कोल्हापूरची निवडणूक अधिकच रंगणार

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या असत्या तर आताच्या इच्छुकांची संख्या कमी झाली असती. ८१ इच्छुकांना निवडणे फार मोठे आव्हान होते. प्रत्येक पक्षाने कमी-जादा करून हा आकडा निश्चित केला आहे. नाराजी असणार आहे.

त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने, क्रॉसव्होटिंग, सेटिंग वगैरे असे काही झाले तर विजयी झाल्यानंतर दोन दिवसांत राजीनामा घेणार, असे सांगितले. असे कोणत्याही कायद्यात नाही, हे माझ्या विरोधकांना माहिती नाही. मोठ्यामोठ्या गप्पा मारून निवडून येता येत नाही. महायुतीने एकत्र येऊन ही यादी तयार केली आहे. महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकेल यात शंका नाही.’

खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूरच्या विकासाचा रोड मॅप घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. राज्यात आणि केंद्र शासनात आमचे सरकार आहे. त्यातून विकासकामे होणार आहेत. विरोधक कितीही ‘टॅगलाईन’ करून ‘तुम्ही म्हणशीला तसे म्हणत’ असले तरीही ते निधी आणू शकत नाहीत.

आमचा जाहीरनामा लोकांच्या, कोल्हापूरच्या विकासाचा आहे.प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घराघरांतून तो येणार आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी महायुती सक्षम आहे. त्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे सर्वांचे समाधान करणे शक्य नव्हते. ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.’

यावेळी सत्यजित कदम, सुनील कदम, अदिल फरास, जयंत पाटील, महेश जाधव, विजय जाधव, रत्नेश शिरोडकर यांच्यासह तीनही पक्षांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यादी वरिष्ठांकडे ... ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार सुरू करण्यासाठी येतील. वरिष्ठांकडे यादी पाठवली असल्यामुळे आज आम्ही ती जाहीर केलेली नाही. उद्या सकाळी ती जाहीर होईल’, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.  

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.