वणी: आद्य स्वयंभू शक्तिपीठ व उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर मंगळवार (ता. ३०)पासून रविवार (ता. ४)पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. नाताळच्या सुट्या, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे अपेक्षित असलेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक भाविक तीर्थक्षेत्रांकडे वळतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या सप्तशृंगगड याठिकाणी दर वर्षी भाविकांसह पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळते. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावे, ही प्रार्थना आणि नव्या संकल्पासह राज्यभरातून तसेच राज्याबाहेरूनही भाविक सप्तशृंगगडावर दर्शनासाठी दाखल होत असतात. नववर्षाची सुरुवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी, ही अनेकांची श्रद्धा असल्याने १ जानेवारीला दर्शनासाठी विशेष गर्दी होते.
मंगळवार हा देवीचा वार मानला जात असल्याने ३० डिसेंबरपासून पुढील सहा दिवस गडावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. याच कालावधीत शाकंबरी नवरात्रोत्सव सुरू असून, १ ते ३ जानेवारीदरम्यान ट्रस्टतर्फे राधा-कृष्ण महायाग होणार आहे. शनिवारी (ता. ३) शाकंबरी पौर्णिमा उत्सव, तर रविवारी (ता. ४) धनुर्मासातील तिसऱ्या रविवारानिमित्त किरणोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कालावधी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे व भाविकांना समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहज दर्शन घेता यावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायत तसेच गुरुबक्षाणी फनिक्युलर रोप वे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी समन्वयाने कार्यरत आहेत.
Melbourne Stadium : मेलबर्न स्टेडियमची खेळपट्टी खराब - आयसीसीचा शेरातीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून पहाटे चारला खुले
नाताळ सणानिमित्त आलेल्या सुट्या व नववर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे त्र्यंबकराजाचे मंदिर मंगळवार (ता. ३०)पासून रविवार (ता.४)पर्यंत पहाटे चारपासून खुले करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. या विषयी सोमवारी अधिकृत पत्र ट्रस्टने जारी केले. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळू शकेल.