मनसेच्या 'गाव तेथे शाखा' अभियानाला प्रतिसाद
esakal January 01, 2026 03:45 PM

मनसेच्या ‘गाव तेथे शाखा’ अभियानाला प्रतिसाद
सुधागड तालुक्यात युवकांचे जाहीर प्रवेश; संघटन बळकट करण्यावर भर
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘गाव तेथे शाखा’ या संघटनात्मक अभियानाला युवकांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.
मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील सुधागड तालुक्यातील गोंदाव गावात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शिवभक्त रमेश घोंगे यांच्यासह राकेश पाठारे, योगेश घोंगे, विनोद पाठारे, रोशन पाठारे, महेश्वर घोंगे यांच्यासह अनेक युवकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. युवकांचा वाढता सहभाग पाहता या भागात मनसेची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘गाव तेथे शाखा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात मनसेची शाखा स्थापन करून तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संदीप ठाकूर यांनी सांगितले. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणुका ताकदीने लढवून मनसेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील विकासकामांसाठी संघर्ष करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे, हे मनसेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पक्षात दाखल झालेल्या युवकांनी संघटन वाढीसाठी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.