मालेगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीत यंदा राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली असून २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. पूर्व भागात एमआयएम विरुद्ध सेक्युलर फ्रंट, तर पश्चिम भागात भाजप-शिवसेना आमनेसामने अशी स्पष्ट लढत दिसून येत आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात भाजप-शिवसेना युती फिसकटल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी मालेगावात पूर्णपणे आकाराला येण्यात अपयशी ठरली आहे. काँग्रेसने केवळ २२, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फक्त १० जागांवर उमेदवार दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने बंडखोरी रोखणे हे सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
शहरातील कॅम्प-संगमेश्वरच्या पश्चिम भागातील पाच प्रभागांमधील २० जागांसाठी भाजप व शिवसेनेकडे इच्छुकांची अक्षरशः गर्दी होती. मात्र स्थानिक नेत्यांच्या तीव्र विरोधामुळे युतीचा बेत रद्द झाला आणि रात्री उशिरा भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपने २५ उमेदवार दिले असून त्यात पाच मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. मुस्लीम उमेदवारीवरून पक्षांतर्गत मतभेद उफाळले होते. तब्बल ३५ मुस्लीम इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती.
शिवसेनेने २६ जागांवर उमेदवार दिले असून प्रभाग क्रमांक २ मध्ये चार उमेदवार उतरवून पक्षाने धाडसी पण धोकादायक डाव खेळला आहे. या प्रभागात ३५ टक्के हिंदू तर ६५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत दहा जागांवर उमेदवार दिले आहेत.
मालेगावात महाविकास आघाडीचा प्रयोग पूर्णतः फसला असल्याचे चित्र आहे. पक्षाचा खासदार असतानाही काँग्रेसला केवळ २२ जागांपुरतेच मर्यादित राहावे लागले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दहा जागांवरच लढत आहे. दुसरीकडे, एमआयएमने ५५ जागांवर उमेदवार उतरवत सर्वाधिक ताकद दाखवली आहे.
BMC Elections : निवडणुकीआधीच वंचितने काँग्रेसचा गेम कसा केला? जागा आहेत, पण उमेदवार नाहीत… आता काय?माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाची आणि शानेहिंद निहाल अहमद यांच्या समाजवादी पक्षाची आघाडी झाली असून या आघाडीने जवळपास ७० जागांवर उमेदवार दिले आहेत.
उमेदवारी न मिळालेल्यांपैकी अनेकांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचा ‘एबी फॉर्म’ मिळवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना आता बंडखोरांना माघारी घ्यायला पटवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. अर्जांची प्रचंड संख्या पाहता, मालेगावातील प्रत्येक प्रभागात बहुरंगी आणि अनिश्चित लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.