नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन अस्वस्थ; खास व्यक्तीच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाले..
Tv9 Marathi January 01, 2026 04:45 PM

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा ‘इक्कीस’ हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. चाहत्यांसाठी तर हा क्षण भावनिक आहेच. परंतु चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि धर्मेंद्र यांचे जवळचे मित्र यांच्यासाठीसुद्धा हा क्षण अत्यंत खास आहे. आपले खास मित्र धर्मेंद्र यांच्या आठवणीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे डोळे भरून आले. ‘कौन बनेगा करोडपती 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी त्यांनी सांगितलं.

‘केबीसी 17’च्या सेटवर ‘इक्कीस’ या चित्रपटातील कलाकार पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. अगस्त्य हा बिग बींचा नातू आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाचा तो मुलगा आहे. या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. केबीसीच्या या खास एपिसोडची सुरुवात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. यावेळी त्यांच्याबद्दल बोलताना बिग बींचे डोळे पाणावले होते. त्यांचा आवाज थरथरत होता.

“इक्कीस हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आपल्या सर्वांसाठीचा शेवटचा मौल्यवाना स्मृतिचिन्ह आहे. लाखो चाहत्यांसाठी त्यांनी हे स्मृतिचिन्ह सोडलं आहे. आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. माझे मित्र, माझे कुटुंबीय आणि माझे आदर्श श्री. धर्मेंद्र देओल यांनी हेच केलं. धरमजी हे फक्त एक व्यक्ती नव्हते, ती एक भावना होती आणि ती भावना कधीही सोडली जाऊ शकत नाही. ती एक आठवण बनून कायम तुमच्यासोबत आशीर्वाद म्हणून राहील आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

View this post on Instagram

A post shared by @sonytvofficial

यावेळी ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “आम्ही बंगळुरूमध्ये शूटिंग करत होतो. धर्मेंद्र यांच्याकडे प्रचंड शारीरिक ताकद होती. ते नायकच नव्हे तर कुस्तीगीरही होते. मी त्यांच्या शारीरिक ताकदीची उदाहरणं पाहिली होती. चित्रपटातील त्यांच्या मृत्यूच्या दृश्यात तुम्ही पडद्यावर पाहिलेली वेदना खरी होती. कारण त्यांनी मला इतकं घट्ट धरलं होतं की वेदना आपोआप माझ्या अभिनयात प्रतिबिंबित होत होत्या. तिथे माझा अभिनय नैसर्गिक होता.”

‘इक्कीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनीही धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की त्यांनी माझ्या चित्रपटात काम केलं. त्यांचा अभिनय खूपच उत्तम होता.” तर धर्मेंद्र यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मीसुद्धा स्वत:ला नशीबवान समजतो, अशी भावना अभिनेता जयदीप अहलावतने व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.