नवगाव जेट्टीचे लोकार्पण
मच्छीमारांना दिलासा
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथील मच्छीमार जेट्टीचे साडेसहा कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले असून सोमवारी (ता. २९) आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या जेट्टीचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मच्छीमारबांधवांना सुरक्षा जॅकेटचे वितरण करण्यात आले. दीर्घकाळ नादुरुस्त अवस्थेत असलेल्या जेट्टीमुळे कोळीबांधवांना मासळी उतरवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा समुद्रात बैलगाडी नेऊन मासळी उतरवावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता.
लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी, माजी सभापती दिलीप भोईर, भाजप भटक्या-विमुक्त सेलचे प्रदेश सरचिटणीस राजू साळुंखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळीबांधवांनी पारंपरिक वेशात कोळीनृत्य सादर करीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनीही कोळी समाजाचा पारंपरिक वेश परिधान केला होता.
चौकट
मासेमारी व्यवसाय सुलभ
जेट्टीच्या दुरुस्तीमुळे आता मासेमारी व्यवसाय अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजनही याच वेळी करण्यात आले. नादुरुस्त जेट्टीमुळे मच्छीमारांच्या दैनंदिन उपजीविकेवर परिणाम होत होता; तो प्रश्न साडेसहा कोटींच्या नूतनीकरणामुळे कायमस्वरूपी सुटला असून हा या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा लाभ ठरला आहे.