नर्सिंग ही केवळ नोकरी नाही, तर त्यागाची भावना
esakal January 02, 2026 04:45 AM

- rat१p५.jpg-
२६O१४८३७
चिपळूण ः नर्सिंग महाविद्यालयास १० लाखांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश देताना उद्योजक अनिरुद्ध देशपांडे.
----
नर्स रुग्णांची खरी आधारवड
बाबासाहेब शिंदे ः नर्सिंग महाविद्यालयाला १० लाखांची शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः वैद्यकीय व्यवसायातील नर्स या रुग्णांसाठी देवतांसमान असून, सदैव त्या रुग्णांची काळजी घेतात. ही केवळ नोकरी नाही तर त्यागाची भावना आहे; परंतु यामध्ये जोखीमही तेवढीच आहे. घाणेखुंट लोटे येथील हे अद्ययावत नर्सिंग कॉलेज आगामी काळात देशभरात नावारूपाला आलेले दिसेल, असे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी नर्सिंग महाविद्यालयातील प्रथमवर्ष शपथविधी कार्यक्रमात सांगितले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या घाणेखुंट-लोटे येथील एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग येथे एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंगमधील प्रथम वर्ष विद्यार्थ्याचा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, पुण्यातील संघचालक रवींद्र वंजारवाडकर, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, विवेक कुलकर्णी, अॅड. सागर नेवासे, डॉ. विवेक कानडे, संतोष देशपांडे, डॉ. अतुल कुलकर्णी, हर्षदा जोशी व प्राचार्य मिलिंद काळे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी देशपांडे यांनी आईच्या नावे १० लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली आणि त्याचा धनादेश संस्थेला दिला. दरवर्षी १० लाखांची शिष्यवृत्ती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी देशपांडे म्हणाले, आपली आई नर्स आणि वडील डॉक्टर असल्याने वैद्यकीय व्यवसायाची चांगली माहिती आहे. त्यामुळे कोकणाला साजेशी इमारत येथे उभी राहील, असे प्रयत्न आहेत. एआय प्रगत तंत्रज्ञान असले तरीही नर्सचे काम रोबो करू शकणार नाही. आजारपणाच्या कालावधीत नर्सच सोबत असतात.

चौकट
सहा जिल्ह्यांत ७५ युनिट
संस्थेचे सहा जिल्ह्यांत काम सुरू असून, ७५ युनिट आहेत. सुमारे ५००हून अधिक नर्सिंग महाविद्यालये असून, या महाविद्यालयाचा पहिल्या १० मध्ये समावेश आहे. कोकणातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन संधीचे सोने करावे, असे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.