कराची - पाकिस्तानचा अनुभवी आणि प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी येत्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेस मुकण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणार असून, पाकचे सर्व सामने श्रीलंकेत नियोजित आहेत.
शाहिन शाह आफ्रिदी ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट्स संघातून खेळत आहे. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याला तत्काळ उपचार आणि त्यानंतरच्या संवर्धनाच्या कार्यक्रमासाठी लाहोर येथील अकादमीत बोलावून घेतले आहे.
आफ्रिदी प्रथमच बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. त्याला गोलंदाज म्हणून प्रभाव पाडता आलेला नाही, तसेच तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचेही जाणवत नव्हते. गुडघा दुखापतीचा त्रास त्याला अगोदरपासूनच होत आहे. २०२१-२२ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा गुडघा दुखावला होता, त्यानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
बिग बॅशमध्ये गुडघा दुखावल्यानंतर पाक क्रिकेट मंडळाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आणि पुढील उपचार तसेच विश्रांतीसाठी त्याला मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. मंडळाच्या डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर ही दुखापत किती गंभीर आहे, याचे निदान होईल आणि त्यानंतर उपचाराची दिशा ठरवण्यात येईल, असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.
बिग बॅश स्पर्धा आपल्याला अर्धवट सोडायला लागली, याची निराशा आफ्रिदीने सोशल मीडियावर व्यक्त केली. आपण लवकरात लवकर मैदानात परतू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
बिग बॅशमध्ये अपयशी
बिग बॅशमध्ये आफ्रिदी चार सामने खेळला. यात त्याला ७६.५०च्या सरासरीने केवळ दोनच विकेट मिळवता आल्या. एका सामन्यात तर एका षटकात दोन बिमर टाकल्यामुळे त्याची गोलंदाजी मध्येच थांबण्यात आली होती.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करताना पाकिस्तानचा संघ श्रीलंकेशी ७ ते ११ जानेवारीदरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.